घरफिचर्ससारांशसमन्वयातून सर्वांगीण विकास

समन्वयातून सर्वांगीण विकास

Subscribe

मनुष्याला भावभावनांच्या अभिव्यक्तीमुळे एक आगळेवेगळे स्थान आहे. शारीरिक, भावनिक व बौद्धिक विकास साधताना व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरवावे लागते. शरीर, मन आणि बुद्धी हे मानवी जीवनाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असून यांच्याच अवतीभोवती आपली वाटचाल सुरू असते. आपल्याकडे आरोग्य हीच संपत्ती, असे सहज बोलले जाते. त्याचे कारण हेच की जीवनात कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी शरीर हे पहिले साधन आहे. सुदृढ, निरोगी शरीर असेल तर जीवनाची वाटचाल सुकर होते. जसे शारीरिक आरोग्य महत्त्वाचे तसेच मानसिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचे आहे.

-अमोल पाटील

शरीर, मन निरोगी असेल आणि याला तल्लख बुद्धीची जोड मिळाली की जीवनाला विशाल आयाम प्राप्त होतो. माणूस जीवनाच्या चढउतारात आंतरिक समन्वय साधून निरंतर वाटचाल सुरू ठेवण्याची कला अवगत करतो. मुळात हे तिन्ही घटक परस्परांपासून भिन्न नसून ते परस्परांभिमुख आहेत हे नीट अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल. शरीर, मन आणि बुद्धी यांचा एकदा का समन्वय घडून आला की जीवनात वादळं निर्माण होण्याची शक्यता तशी पुसटच.

- Advertisement -

त्याचे कारण असे की आपल्या जीवनात ज्या काही समस्या, आव्हानांना आपण तोंड देत असतो त्यातील बहुतांश समस्या, आव्हाने ही अनारोग्य आणि अज्ञानामुळे निर्माण झालेली असतात. म्हणून आरोग्यसंपदा आणि ज्ञानसंपदा प्राप्त करणे व यातून अंतिमत: आनंदप्राप्ती होणे असे हे साधे आणि सरळ गणित आहे. जीवनात एखादा निर्णय घेताना, दिशा ठरवताना किंवा त्यायोगे कृती करताना या तिन्ही अंगांनी प्रगल्भता प्राप्त माणसं सहसा चाचपडत नाहीत.

सर्वार्थाने प्रगल्भता प्राप्त झालेली माणसं ही आत्मविश्वासाने निर्णय घेताना व तशी कृती करताना पाहायला मिळतात. शरीर, मन आणि बुद्धीचा विकास साधणे हे प्रयत्नांती सहज शक्य आहे. शरीराला व्यायामाने, मनाला संस्काराने, तर बुद्धीला चिकित्सक वृत्तीने अधिकाधिक प्रगल्भतेकडे घेऊन जाता येते. या प्रक्रियेद्वारे विकसित व्यक्तिमत्त्व हे सर्वांगाने समृद्ध होते.

- Advertisement -

आजच्या धावपळीच्या जगण्यामध्ये माणसाला आपल्या शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नाही. सदोष आहार पद्धती, अपुरी झोप, हालचाल व व्यायामाचा अभाव, दूषित हवा, अन्नपाणी अशी काही नेमकी व ठळक कारणे आजच्या आरोग्य समस्येच्या बाबतीत आपण सांगू शकतो. हाव व ईर्ष्येला पेटलेल्या आजच्या माणसाला चंगळवादाच्या पाठीमागे धावताना आपले आरोग्य ढासळत चालले आहे याचेही भान राहत नाही.

ऐन तारुण्यात वेळेवर जेवणही न करणारा आणि जेवताना भुकेचे भानही विसरून बेभान अशा पद्धतीने जेवणावर ताव मारणारा माणूस आपल्याच वृद्धकाळात या सवयींचा पश्चात्ताप करताना दिसतो. कारण योग्य वेळी पुरेसे न जेवणे व एखादा पदार्थ आवडतोय म्हणून गरजेपेक्षा जास्त जेवणे दोन्हीही हानिकारकच. लागेल तेवढं आणि हवं तेव्हा संतुलित, सकस आहार हा साधा नियम जेवणाबाबत पाळला की आरोग्याची चिंता काही प्रमाणात का होईना मिटते. जसे खाणे महत्त्वाचे तितकेच पचवणेही महत्त्वाचे आहे.

आजच्या काळात शारीरिक श्रमाची कामे न करणार्‍या मंडळींना तासन्तास एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते. अशा मंडळींची शारीरिक हालचाल आवश्यक प्रमाणात घडत नाही व त्याचा परिणाम पुढे त्यांच्या आरोग्यावर होतो. नोकर्‍यांचे बदलते स्वरूप, प्रवास, कौटुंबिक तथा सामाजिक परिस्थिती यादेखील माणसाच्या शारीरिक आरोग्याशी निगडित बाबी आहेत. अपुरी झोप शारीरिक आरोग्याची हेळसांड होण्यास कारणीभूत आहे. योग्य व्यायाम, योग्य आहार व पुरेशी झोप ही शरीर स्वास्थ्य मिळवून देणारी त्रिसूत्री आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

त्याचे मन खूप हळवे आहे, त्याला पटकन राग येतो, तो अतिउत्साही आहे, अशी कितीतरी व्यक्तीनिरीक्षणाची वाक्ये कुणाच्या ना कुणाच्या तोंडून कुणाच्या ना कुणाच्या बाबतीत आपल्याला रोज ऐकायला मिळतात. आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्वत:सह समाजाचे क्षणोक्षणी मूल्यमापन करीत जीवन जगतो. अशा मूल्यमापनातूनच प्रत्येकाच्या अंगी एक स्वत:ची विचारसरणी विकसित होत गेलेली असते. मग पुढे हीच विचारसरणी त्याला जीवन जगण्यास, निर्णय घेण्यास, बोलण्यास, वागण्यास, कृती करण्यास मार्गदर्शनपर कार्यरत असते.

मनुष्य प्राण्याचे जीवन अनेक भावभावनांनी नटलेले आहे. यातील प्रत्येक भावनेचे एक वेगळे स्थान आहे. या भावभावनाच माणसाचे जीवन एकतर फुलवतात, अन्यथा झुलवतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इतरांप्रति प्रेम, जिव्हाळा, माया, ममता हे आपले जीवन या जगती फुलवण्याचे काम करतात, तर इतरांप्रति द्वेष, मत्सर, राग हे आपले जीवन नाहक झुलवण्याचे काम करीत असतात. द्वेष, मत्सर, राग या अखिल मानवजातीचे तथा स्वत:चे हित वा उत्कर्षामध्ये अडसर ठरणार्‍या ज्या बाबी आहेत, भावभावनांचे नियंत्रण हे माणसाला शक्य झाले की त्याच्या जीवनातील बहुतांश समस्या संपुष्टात येतात व तो उत्तम मानसिक आरोग्याचा धनी होतो.

आभासी जगातून थोडसं बाहेर येऊन आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचे जीवन पाहायला हवे. प्रत्येक अनुभव स्वत: घेईन आणि त्यातून शिकेन असं जर कुणी ठरवलं तर इतरांना आलेल्या अनुभवातून शिकून स्वसुधारणा करण्याच्या मोठ्या संधीला तो सहज मुकत असतो. उत्तम सहवास, सर्वोत्तम वाचन, जाणकारांशी सुसंवाद, परिस्थितीचे मूल्यमापन यातून मनावर होत गेलेले संस्कार हेच मनाला प्रगल्भ करतात.

कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी किंवा एखाद्या बाबीचा स्वीकार होण्यापूर्वी ती गोष्ट पाहणे, तिला समजून घेणे आणि मग स्वीकारणे हे ढोबळमानाने दिसून येते. यातील समजून घेण्याची त्या गोष्टीची चिकित्सा करण्याची जी प्रक्रिया आहे तिथं आपल्या बुद्धीचा कस लागतो. खरं-खोटं, योग्य-अयोग्य, हितदायी-अहितदायी हे सारं या प्रक्रियेत ठरवून ते स्वीकारार्ह की अस्वीकारार्ह ठरवणे अपेक्षित असते. चिकित्सा करण्याचे, सर्व बाजू तपासून नीट पाहण्याचे कौशल्य अंगी बाणवता आले तर निर्णय सहसा चुकत नाहीत व चुकीच्या निर्णयामुळे होणार्‍या श्रम, मेहनत व पैशांचा अपव्यय टाळता येतो.

बुद्धीचे माणसाच्या जीवनात अगाध महत्त्व आहे. आजची ही प्रगती बुद्धिमत्तेच्या जोरावरच झालेली आपल्याला पाहायला मिळते. साधनेतील प्रगतीमध्ये बुद्धी मोलाची ठरते. कृतीला जेव्हा बुद्धिमत्तेची जोड मिळते तेव्हा सृजनाचा उगम होतो. माणसाची अज्ञानाकडून ज्ञानाकडे होणारी वाटचाल व या विश्वातील प्रत्येकाची निरामय आनंदप्राप्तीसाठीची धडपड याच बुद्धिमत्तेच्या जोरावर पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता असते. म्हणून बुद्धिमत्तेला व तिच्या विकास साधनेला आपल्या जीवनात फार मोठे स्थान आहे.

थोडक्यात बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकास साधत समन्वयातून सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करीत राहणे अत्यावश्यक आहे. कमालीची बदललेली जीवनशैली व यातून प्रभावीत झालेला जीवनव्यवहार हा प्रकर्षाने तपासून घ्यायला हवा. चांगले विचार अंगी बाणवले तरच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडेल.

शरीर, मन, बुद्धीच्या
निर्मिती अन् प्रकृतीच्या
समन्वयातून सर्वांगीण विकास
हा प्रवास सारा प्रयत्नाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -