घरफिचर्ससारांशमाय मानतो मराठी...

माय मानतो मराठी…

Subscribe

आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. हे संंपर्क क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. अशा वेळी आपणच आपल्या बोलण्यात जास्तीत जास्त मराठी भाषेतील शब्द वापरले तर भाषेच्या संवर्धनासाठी एक अल्पकृती आपल्याकडून होऊ शकते. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठी भाषेत येत आहे. त्याला उभारी देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान आणि तिची जोपासना करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी. मराठी भाषाप्रेमींना पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत, त्यांना ती मोबाईल अथवा संगणक, लॅपटॉपवर सहज वाचता यावीत यासाठी क्यूआर कोडच्या तंत्राने ६००हून अधिक दर्जेदार पुस्तके महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत.

-नारायण गिरप

दर्‍या-खोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती, मी मराठी…मी मराठी! कोणत्याही मराठी भाषिकाला स्फुरण चढेल या ओळींतून! सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गडकिल्ले, दर्‍या-खोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्रभूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस! पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत अपभ्रंश टप्प्यातून उत्क्रांत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले.

- Advertisement -

हे वाक्य शके ९०५ मधील असून ‘श्री चामुंडेराये करविले’ असे आहे. त्यानंतर आद्यकवी मुकुंदराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ठ्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ. ज्ञानेश्वरांनी माझा मराठीची बोलु कौतुकें। परि अमृतातेहीं पैजासीं जिंके। ऐसीं अक्षरें रसिकें। मेळवीन। अशा शब्दांत मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त असल्याचे म्हटले आहे.

भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी व भावार्थदीपिका या ग्रंथांचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला पद्य चरित्र ग्रंथ. तेव्हापासून पद्य लेखनाची परंपरा सुरू झाली. श्री चक्रधर स्वामींच्या या ग्रंथात गतिमानता, सहज सौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे १३व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.

- Advertisement -

कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल्या यादवी सत्ता, शिवरायांची सत्ता, पेशवाई सत्ता आणि इंग्रजी सत्ता! प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच प्रमाण मराठी, अहिराणी, मालवणी, वर्‍हाडी, कोल्हापुरी असे अनेक पोटप्रकार पडत गेले.

शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा मराठीवर झालेला प्रभाव दिसून येतो. त्या काळात राजकीय पत्रव्यवहार, बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला आढळतो. पेशवे काळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणार्‍या पंडिती कविता लिहिल्या गेल्या. उदा. रघुनाथ पंडित यांनी रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती स्वयंवर अशी अजरामर काव्ये लिहिली.

नंतरच्या काळात लोकजीवनाशी व लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकारास आली. खास मराठमोळ्या शैलीत साकार करणार्‍या शाहिरी कविता हे मराठी कवितेचे एक भूषणच! त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोवाडा, त्याचबरोबर लोकगीतांचाही समृद्ध वारसा मराठीला लाभला. इंग्रजी सत्तेच्या स्थापनेनंतर इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा आदी अनेक नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले.

केशवसुत हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते, तर कवितेला नवे वळण देण्याचे कार्य १९४०-४५च्या काळात मर्ढेकरांनी केले. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके आदी साहित्यिकांनी मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. पुढे माय मराठीच्या सन्मानार्थ जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला ज्ञानपीठ पुरस्कार लाभलेले कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन साजरा होऊ लागला/होत राहील.

१४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे हा यामागचा हेतू आहे. मराठी भाषेतील वाङ्मयासंबंधित विविध परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे, कविसंमेलने, हास्य कविसंमेलने, एकांकिका, बालनाट्य, नाटके, नाट्यवाचन, उतारा वाचन, पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्य पुरस्कार वितरण, निबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, हस्ताक्षर, शुद्धलेखन, वक्तृत्व, घोषवाक्य, अभिवाचन, वादविवाद, अंताक्षरी, शब्दकोडी, पुस्तकांचे परीक्षण, रसग्रहण, समीक्षण, परिच्छेद अनुवाद आदि स्पर्धा घेणे, कार्यक्रम राबवणे, अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातून याची अंमलबजावणी केली जाते. ग्रंथदिंडी, माहितीपट, ग्रंथ प्रदर्शन इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात.

मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खासगी दूरदर्शन, एफएम रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आदी आधुनिक प्रसारमाध्यमातून याबाबतचे दृकश्राव्य संदेश प्रसारित केले जातात. मराठी वाचनसंस्कृती जपण्यासाठी सर्वांनी मराठीतील साहित्य स्वयंस्फूर्तीने वाचणे तसेच पुस्तक विकत घेऊन वाचणे, इतरांना भेट देणे इत्यादी उपक्रम राबविले जातात. ते सर्व उपक्रम योग्य व स्तुत्य आहेत. तसेच उपक्रम २७ फेब्रुवारीलाही होताना दिसणार आहेत. मराठी भाषा फक्त घरात-बाहेर बोलण्यापुरती राहून चालेल का? मराठी भाषा ही व्यवसाय उपलब्ध करून देणारी, जीवन सार्थकी लावणारी झाली पाहिजे. ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या उच्चस्तरीय पातळीवरही याची दखल घेतली गेली पाहिजे.

माणसाला घडवण्याकरिता दोन गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. पहिली म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याला लाभलेली माणसं आणि दुसरी म्हणजे वाचन. म्हणूनच पुस्तकांना काळाच्या विशाल सागरातून माणसाला तारून नेणारं जहाज असंही म्हटलं जातं. वाचनाने विचारांची समृद्धी तर येतेच शिवाय नव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना प्रभावी ठेवण्याची ताकद वाचनातून मिळते. नवे विचार स्फुरतात आणि लेखणीतून ते अलवार कागदावर उतरतात. म्हणूनच वाचनाला लेखनाची प्रेरणा म्हटले जाते.

वाचन कल्पनाशक्ती वाढवते, सृजनशीलतेला चालना देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसर्‍याचे सुखदुःख जाणणारे संवेदनशील मनही निर्माण करते. पुस्तकांशी कधीतरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथसंगत करीत राहतात. जगातील कानाकोपर्‍यातील व्यक्तींशी आपलं नातं जोडणारी भूत, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारी पुस्तकं ‘हे विश्वची माझे घर’ याचा पुन्हा पुन्हा साक्षात्कार घडवतात. म्हणूनच वाचनसंस्कृती रुजली पाहिजे.

आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. हे संंपर्क क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. अशा वेळी आपणच आपल्या बोलण्यात जास्तीत जास्त मराठी भाषेतील शब्द वापरले तर भाषेच्या संवर्धनासाठी एक अल्पकृती आपल्याकडून होऊ शकते. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठी भाषेत येत आहे. याला उभारी देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान आणि तिची जोपासना करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी.

मराठी भाषाप्रेमींना पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत, त्यांना ती मोबाईल अथवा संगणक, लॅपटॉपवर सहज वाचता यावीत यासाठी क्यूआर कोडच्या तंत्राने ६००हून अधिक दर्जेदार पुस्तके महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. मराठी भाषेचा गोडवा इतरही राज्यात पसरलेला आहे. त्यामुळे मराठी भाषा ‘अभिजात दर्जा’च्या दिशेने यशस्वी पाऊल टाकत आहे. त्यासाठी नुकतीच समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.

सर्वांनीच रोजच्या व्यवहारातही मग बाजारपेठेत असो वा उपाहारगृहात, कार्यालयात असो वा शाळा-महाविद्यालयांत मुखी माय मराठीचाच वापर केला पाहिजे. मराठी माणसाने मराठी भाषेबद्दलचा मनातील न्यूनगंड काढून टाकायला हवा. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी कविवर्य सुरेश भटांनी मराठीची अस्मिता जपणारे मराठी विषयीचे,

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी’

हे अभिमानाने लिहिलेले गौरवगीत आपण सर्वांनी सार्थ ठरवले पाहिजे.

-(लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -