घरफिचर्ससारांशजीवघेणी अतिसुरक्षा!

जीवघेणी अतिसुरक्षा!

Subscribe

मुलाने केलेल्या अनपेक्षित आत्महत्येनंतर अनु मुलीला वाढवताना मात्र सावध झाली. काही चुका सुधारल्या. लोकांनी नावं ठेवली तरी चालतील, पण तिला बोल्ड बनवलं. तिला भरपूर मित्रमैत्रिणी करू दिल्या, हवं त्यात सहभागी होऊ दिलं, तिला अगदी खमकी बनवलं. आता कुठल्याही प्रसंगाला ती तोंड देऊ शकेल, सामोरी जाऊ शकेल, इतकं तिला भक्कम बनवलं. सध्या ती उच्चशिक्षणाला बाहेरच्या देशात एकटी राहते...आईलाही मैत्रिणींसोबत बिझी राहा, जीवनाचा आनंद घे, असा सल्ला देते.

अनुची न माझी अगदी अलिकडचीच ओळख. मला तिच्या खासगी आयुष्याबाबत काही माहिती नव्हती. एकदा सहज बोलता बोलता मी तिला पती काय करतात, मुलं किती, काय करतात असे विचारले, तेव्हा बोलण्यातून समजलं की तिला 2 मुलं होती म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी उच्च शिक्षण घेतेय आणि मुलगा 11 वीत असताना 5 वर्षांपूर्वी अचानक त्याने आत्महत्या केली. कारण अजूनही गुलदस्त्यातच.. घरच्यांना त्याचे रॅगिंग झाले असा संशय आहे. पण त्याने घरात तसे काही बोलून दाखवले नव्हते..आपला मुलगा डिस्टर्ब आहे, त्याचे काहीतरी बिनसलेय हेदेखील घरच्यांना समजू शकले नाही. अनु आणि तिचे पती दोघेही नोकरी करतात, त्यामुळे मुलांना जास्त वेळ देऊ शकत नव्हते, पण मुलांचे सर्व लाड पुरवत.. बाकीची मुलं शाळेत व्हॅन, रिक्षा किंवा बसने जायची, पण आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये ही धडपड कायम असायची.

मुलांना कसलाच त्रास होऊ नये, तसदी पडू नये म्हणून अनुने त्यांना स्पेशल रिक्षा लावली होती. मुलांना कधीच काही कमी पडू दिले नाही. मुलांना मित्रपरिवारदेखील मर्यादितच.. त्यामुळे मित्रांसोबत भांडणं, मारामारी, रुसवे फुगवे आणि पुन्हा एकत्र येणे हेदेखील मुलांना जास्त माहीत नाही. थोडक्यात, आयुष्यात काही कमीच पडत नव्हतं. त्यांना स्ट्रगल करणेच माहीत नाही. दुःख किंवा एखादी घटना सहन करायची.. तोंड द्यायची वेळच कधी पडली नाही…कशाला नाही ऐकण्याची सवयच नाही. कुठल्याच संकटांना तोंड देण्याची वेळ कधी पडली नाही. कसलं दुःखच माहीत नाही. त्यामुळे ती पेलण्याची, पचवण्याची ताकद तरी कुठून येणार.

- Advertisement -

मुलगा दिसायलाही सुंदर आणि अभ्यासातदेखील हुशार.. तो 10 वीतून 11 वीत गेला. नवं ठिकाण, नवे मित्र, यात अजून त्याला समरस होता आलं नव्हतं. 6 महिने झाले तरी तो अ‍ॅडजस्ट झाला नव्हता.. जरा गप्प गप्पच असायचा. आणि एक दिवस अचानक घरात सणासुदीचे वातावरण असताना त्याने वरच्या रूममध्ये जाऊन आत्महत्या केली. अचानक काय त्याला काय झालं कोणालाच कळले नाही. घरच्यांना प्रचंड शॉक बसला… घरचे, कॉलेजचे मित्र सगळ्यांची चौकशी जबाब झाले, पण कशामुळे ते काहीच समजू शकले नाही. तेव्हापासून आतापर्यंत अनुने दिवाळी साजरी करणे सोडून दिले… दिवाळी आली की ती वाईट आठवण नको म्हणून ऐन सणासुदीला बाहेर गावी ट्रीपला जाते.

त्यानंतर मुलीला वाढवताना मात्र ती सावध झाली. काही चुका सुधारल्या. लोकांनी नावं ठेवली तरी चालेल, पण तिला बोल्ड बनवलं. तिला भरपूर मित्रमैत्रिणी करू दिल्या, हवं त्यात सहभागी होऊ दिलं, तिला अगदी खमकी बनवलं. आता कुठल्याही प्रसंगाला ती तोंड देऊ शकेल, सामोरी जाऊ शकेल इतकं तिला भक्कम बनवलं.. सध्या ती उच्चशिक्षणाला बाहेरच्या देशात एकटी राहते…आईलाही मैत्रिणींसोबत बिझी राहा, जीवनाचा आनंद घे असा सल्ला देते.

- Advertisement -

खरंच आपण मुलांना अतिसुरक्षित वातावरण देतोय का? आपल्याला जे लहानपणी मिळालं नाही जे सहन करावं लागलं ते मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून जास्तच भावनिक होतो. अतिकाळजी घेतो. त्यांना पडू नये, इजा होऊ नये म्हणून जपतो, पण मुलंच ती धडपडल्याशिवाय मोठी कशी होणार. सायकल शिकवताना मुलं पडतील, असा विचार केला तर सायकल कशी शिकणार? आपण स्वतः काटकसर करून मुलांसाठी घर, गाडी, संपत्ती, शेती, इतर मालमत्ता, व्यवसाय सगळं करून ठेवतो. स्वतःची हौस मौज बाजूला ठेवतो. स्वतः उपभोग घ्यायचा तर तो घेत नाही. का तर आपल्यासारखी गरिबी त्याचा वाट्याला येऊ नये.

अरे पण आपल्याकडे हे सगळं नव्हतं, त्यामुळेच तर आपण काहीतरी करू शकलो. आपल्याला समोर टार्गेट होतं. त्यांनाही काही तरी आयुष्यात ध्येय हवेच. आपण सगळं तयार करून ठेवलं तर त्याला करायला शिल्लक काय राहील..तो निष्क्रिय नाही होणार का…मग एवढ्या पैशाचं करायचं काय म्हणून त्याला इतर नाद लागले तर! याचा अर्थ असा नाही की मुलांसाठी कमवून ठेऊ नका. नक्कीच कमवा, पण स्वतःही उपभोग घ्या. त्यांनाही थोडा स्ट्रगल करू द्या. त्यांना करण्यासाठी काही शिल्लक राहू द्या. आयुष्यात येणार्‍या अडीअडचणींना, संकटांना सामोरे जाण्याचे बळ येऊ द्या. दुःख सहन करायची, पचविण्याची ताकद येऊ द्या.

माणसाचा घडीचा भरवसा नाही. आपण काय आयुष्यभर त्यांना पुरणार आहोत का? ..मग अचानक त्यांना कुठल्या धक्क्याला सामोरे जाता येईल का? ते कोलमडून तर जाणार नाहीत ना. याचाही विचार करायला हवा. आपण एखादं झाड लावलं आणि त्याला रोज खत पाणी टाकत बसलो तर ते झाड नीट वाढणार नाही. जास्त पाण्यामुळे पिवळे पडेल. जास्त खतामुळे करपेल, मुळं लांबवर जाणार नाहीत, मग एखाद्या छोट्या वादळानेही ते उध्वस्त होईल…तेच एखाद्या झाडाला आवश्यकतेनुसार हवं तेवढंच पाणी दिलं. गरज पडेल तेव्हाच खत दिलं. पाण्याचा थोडा ताण दिला तर त्याची मुळं पाण्यासाठी लांब पसरतील आणि जमीन घट्ट पकडून ठेवतील आणि मग जोराचा वादळ वारा आला तरी ते झाड ताठ उभं राहिलं. तसंच मुलांचं होईल, आपण त्यांना अति जपले, तर बाहेरच्या वातावरणात ते तग धरू शकणार नाहीत. अचानक आलेल्या संकटाने ते गांगरून जातील. मुलगा असो व मुलगी त्यांना चांगलं स्ट्राँग बनवा. त्यामुळे मुलांचे संगोपन करताना हाही विचार व्हायला हवाच….हो ना!

— रेखा पोखरकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -