घरफिचर्ससारांशक्रांतिकारक खुदीराम बोस

क्रांतिकारक खुदीराम बोस

Subscribe

खुदीरामची ही लहान वयातील देशनिष्ठा पाहूनच पुढे क्रांतिकारकांनी त्याची निवड एका साहसी कार्यासाठी केली होती. क्रूर, अत्याचारी, राक्षसी वृत्तीचा न्यायाधीश किंग्जफोर्ड याने चालवलेल्या अत्याचारांचा बदला घेण्याचा निश्चय क्रांतिकारकांनी केला. त्यासाठी फार मोठ्या साहसाची, धैर्याची, सहनशील वृत्तीची आवश्यकता होती. खुदीराममधील हे गुण लक्षात घेऊन क्रांतिकारकांनी त्याची निवड केली. त्याच्या जोडीला प्रफुल्लकुमार चाकीचीही निवड झाली. वधाची तारीख ठरली ३० एप्रिल १९०८. किंग्जफोर्डची बग्गी पुढ्यात येताच खुदीरामनं बग्गीवर बॉम्ब फेकला. एका भारतीयानं इंग्रज साम्राज्यावर मोठ्या धैर्याने फेकलेला हाच तो पहिला बॉम्ब होता.

-पुष्पा गोटखिंडीकर

एकदा काय झालं शिक्षकांनी वर्गामध्ये मुलांची एका वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरविले. ते म्हणाले, मुलांनो, मला तुमची शारीरिक क्षमता कशी आहे ते पाहायचे आहे. प्रत्येकाने इथे टेबलाजवळ यायचं आणि टेबलावर बुक्के मारायचे. जो जास्त बुक्के मारेल तो अर्थातच जिंकेल. मुलांनी एकापाठोपाठ एक येऊन टेबलावर बुक्के मारायला सुरुवात केली.

- Advertisement -

कोणी दोन तर कोणी चार, कोणी सहा बुक्के मारून बाजूला झाले. एक दोघांनी आठ-दहा बुक्के मारले. मग तेसुद्धा दमले. ते पाहून एक सावळ्या रंगाचा, कुरळ्या केसांचा, सडपातळ मुलगा उठला. आता हा काय दिवे लावणार? अशा नजरेने सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि त्याची टर उडवू लागले.

तो टेबलाजवळ आला. शिक्षकांना नमस्कार करून त्याने टेबलावर बुक्के मारायला सुरुवात केली. मोठ्या जोशाने तो बुक्के मारू लागला. एक, दोन, पंचवीस, सत्तावीस पाहता पाहता त्याची बोटे रक्ताळली तरी त्याचे बुक्के मारणे चालूच होते. सर्वजण आश्चर्यचकित झाले. अरे, थांब थांब… पुरे कर! शिक्षक ओरडले आणि मग तो थांबला. आपली टर उडवणार्‍या मुलांकडे त्यानं पाहिलं. सर्वजण गपगार झाले. त्या पठ्ठ्याने ३० बुक्के मारले होते. त्याच्या हातातून रक्त ठिबकत होतं. तरीही त्याच्या चेहर्‍यावर वेदना दिसत नव्हत्या.

- Advertisement -

शाब्बास! खुदीराम, त्याच्या शिक्षकांनी कौतुकाने त्याची पाठ थोपटली. काय रे खुदीराम, सर्वजण पाच-सात बुक्क्यांमध्येच गारद झाले आणि तू मात्र एवढे ३० बुक्के कसे काय मारू शकलास? असं शिक्षकांनी खुदीरामला विचारलं.
ते काही फार अवघड काम नव्हते, खुदीराम हसत हसत म्हणाला.

म्हणजे? शिक्षकांनी अचंब्याने विचारलं.

गुरुजी, त्या टेबलाला मी ब्रिटिश माणूस समजलो. त्यामुळे मी मारत असलेल्या बुक्क्यांचा जोर वाढत गेला. बस्स एवढेच, खुदीराम सहजपणे म्हणाला.

अशा प्रकारे शालेय वयातच त्याला अभ्यासापेक्षा आपल्या पवित्र मातृभूमीच्या स्वातंत्र्याची विलक्षण ओढ लागलेली होती. दिवसरात्र तो याच विचाराने अस्वस्थ व्हायचा. अभ्यासाच्या पुस्तकातदेखील त्याला हे तांबूस, गोर्‍या रंगाचे, हिरव्या डोळ्यांचे इंग्रज दिसायचे. मी मोठा होईन आणि इंग्रजांना माझ्या भारतातून हाकलून लावेन हाच ध्यास त्याच्या मनानं घेतला होता.

खुदीरामची ही लहान वयातील देशनिष्ठा पाहूनच पुढे क्रांतिकारकांनी त्याची निवड एका साहसी कार्यासाठी केली होती. कशासाठी होती ही निवड? क्रूर, अत्याचारी, राक्षसी वृत्तीचा न्यायाधीश किंग्जफोर्ड. त्याने चालवलेल्या अत्याचारांचा बदला घेण्याचा निश्चय क्रांतिकारकांनी केला. ही शिकार सामान्य नव्हती. त्यासाठी फार मोठ्या साहसाची, धैर्याची, बेधडक अन् सहनशील वृत्तीची आवश्यकता होती.

खुदीराममधील हे गुण लक्षात घेऊन किंग्जफोर्डचा वध करण्यासाठी त्याची निवड केली गेली. त्याच्या जोडीला प्रफुल्लकुमार चाकीचीही निवड झाली. वधाची तारीख ठरली ३० एप्रिल १९०८. हातामध्ये पिस्तूल आणि बॉम्ब घेऊन दोघेही किंग्जफोर्डच्या मार्गावर दबा धरून बसले. किंग्जफोर्डची बग्गी पुढ्यात येताच खुदीरामनं बग्गीवर बॉम्ब फेकला. एका भारतीयानं इंग्रज साम्राज्यावर मोठ्या धैर्याने फेकलेला हाच तो पहिला बॉम्ब. बॉम्बने करण्यात आलेली ही पहिलीच राजकीय हत्या. खुदीरामने फेकलेला बॉम्ब बग्गीवर पडताच प्रचंड स्फोट झाला. गाडीतून किंकाळ्यांचे आवाज ऐकू आले. सगळीकडे एकच हाहाकार उडाला. खुदीराम आणि प्रफुल्लकुमारच्या पराक्रमाने शिकार साधली होती, पण दुर्दैवानं त्या बग्गीत किंग्जफोर्ड नव्हता. गाडीच्या रंगसदृश्यामुळे खुदीरामची आणि प्रफुल्लकुमारची फसगत झाली होती.

आता काय होणार याचा विचार न करताच दोघेही विद्युत वेगाने दोन विरुद्ध दिशांनी धावत सुटले. प्रफुल्लकुमार पळून पळून थकला होता. विश्रांतीसाठी झाडाखाली बसला असताना तिसर्‍या दिवशी पोलिसांनी त्याला पकडलंच. आता आपली यातून सुटका नाही हे प्रफुलकुमारने ओळखलं. इंग्रजांच्या स्वाधीन होण्यापेक्षा प्राणत्याग करण्याचा निश्चय त्याने केला आणि आपलंच पिस्तूल आपल्यावर रोखून प्रफुल्लकुमारने भारतमातेसाठी आत्मसमर्पण करून या जगाचा निरोप घेतला.

खुदीराम रात्रभर रेल्वे लाईनवरूनच सुसाट पळत राहिला. पळून पळून तो आता थकला होता. त्याला खूप तहान लागली होती. जवळच त्याला एक छोटंस हॉटेल दिसलं आणि म्हणून पाणी पिण्यासाठी तो हॉटेलमध्ये शिरला. एव्हाना बॉम्बफेकीची घटना सर्वदूर पसरली होती. खुदीराम बसला होता त्या हॉटेलमध्ये जे लोक होते तेही याच विषयावर बोलत होते. लोकांची काय चर्चा चालू आहे हे ऐकण्यासाठी त्याने आपले कान टवकारले.

या बॉम्बफेकीत केवळ दोन महिला ठार झाल्याचं त्याच्या कानावर पडताच न राहवून अभावितपणाने तो त्यांना म्हणाला, म्हणजे? किंग्जफोर्ड मेला नाही? त्याच्या या प्रश्नामुळे तेथे असलेल्या लोकांची दृष्टी त्याच्याकडे वळली. खुदीरामचा चेहरा गावकर्‍यांना नवीनच वाटला. तो खूप थकलेला दिसत होता. बॉम्ब फेकणारा तरुण युवक हा तर नसेल? असा संशय हॉटेल मालकाला आला आणि समोरूनच जाणार्‍या पोलिसांना हॉटेल मालकाने इशारा केला.

खुदीराम पाण्याचा एक घोट घेणार तोच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला अटक केली. त्याला फाशीची शिक्षा फर्मावली गेली. खुदीरामच्या फाशीची तारीख ठरली ११ ऑगस्ट १९०८. भगवद्गीता हातामध्ये घेऊन हसतमुखाने ‘वंदे मातरम्’चा उद्घोष करीत खुदीराम वधस्तंभावर चढून गेला. तोच दोर आवळला गेला आणि सारं संपलं. खुदीराम हुतात्मा झाला. खुदीरामसारखा कोवळा तरुण वीरमरण पत्करून अमर झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -