घरलाईफस्टाईलओळख विसरत चाललेले हॉटेल फिरदोस

ओळख विसरत चाललेले हॉटेल फिरदोस

Subscribe

येथे चिकन आणि मटणाचे पारंपारिक मुस्लीम पदार्थ लाजवाब मिळतात. या हॉटेलातील मटण मसाला ही डिश अतिशय साधी पण हॉटेल फिरदोसचा पारंपारिक मुस्लीम टच, यामुळे येथे मटण मसाला खाणे म्हणजे एक पर्वणी असते.

खवय्येगिरीबद्दल आपल्याकडे अजूनही खूप सारे अज्ञान आहे. त्यामुळे कुठे काय, खावे आणि खाऊ नये, हे अनेकांना कळतच नाही. अनेक व्यक्ती अगोदरच मनात काय खायचे, हे ठरवून येतात. मग हॉटेलमध्ये शिरतात. पण आपण ज्या हॉटेलमध्ये शिरतोय तेथे ते पदार्थ चांगले मिळतात का, याचा कोणीही विचार करत नाही. एखाद्या उडप्याच्या हॉटेलमध्ये बसल्यावर कोणी मंच्युरियन अथवा बिर्याणी मागवली की ती व्यक्ती डोक्यात शिरल्या शिवाय राहात नाही. अगदी हॉटेलच्या मालकालाही हे पटत असते. पण तो तरी काय करणार? त्याला धंदा करायचा असतो.

काल शनिवारी, क्रॉफर्ड मार्केटला खरेदीला गेलो होतो. क्रॉफर्ड मार्केटला खरेदी म्हणजे एकप्रकारची पर्वणी असते. मुळात इथे व्हरायटी मिळते. दुसरे म्हणजे खरेदी झाली की, भरपेट खास पदार्थ हॉटेलात खायला मिळतात. शनिवारी क्रॉफर्ड मार्केट आणि त्याच्या परिसरात खरेदी झाल्यावर अचानक हॉटेल फिरदोसची आठवण झाली. साधारणत: एका दशकापूर्वी या हॉटेलमध्ये शेवटचे गेलो होतो. त्या अगोदर तेथे नियमित येणे-जाणे होते. येथील चिकन आणि मटणाचे पारंपरिक मुस्लीम पदार्थ लाजवाब मिळतात. त्यातही या हॉटेलात मला सर्वात आवडणारा पदार्थ म्हणजे मटण मसाला. ही डिश म्हणजे अतिशय साधी. पण हॉटेल फिरदोसचा पारंपरिक मुस्लीम टच, यामुळे येथे मटण मसाला खाणे म्हणजे एक पर्वणी असते.

- Advertisement -

सुमारे एका दशकापूर्वी या हॉटेलमध्ये फक्त आणि फक्त मोघलाई फुड मिळायचे. डोक्यात तोच विचार आणि जीभेवर तिच जुनी मटण मसालाची चव रेंगाळली. क्रॉफर्ड मार्केटच्या समोरच्या एका छोट्याशा गल्लीत जेथे खेळण्याची दुकाने आहेत, तेथे हे हॉटेल फिरदोस आहे. शनिवारी हॉटेलमध्ये शिरलो तर हॉटेलची रंगरंगोटी झाली होती. कालानुसार प्रत्येकाने बदलले पाहिजे तसेच हॉटेल फिरदोसही बदलले होते. हॉटेल तसे लहान. सोबत पत्नी होती. त्यामुळे हॉटेलच्या परंपरेनुसार त्यांनी मला खाली बसायला दिले नाही. फॅमिलीसोबत आहे मग वर. त्यामुळे गुपचूप वर गेलो. वेटरने मेन्युकार्ड समोर ठेवले. संपूर्ण मेन्युकार्डवर नजर फिरवली तर मटण मसाला ही डिश कुठेच दिसेना. पंजाबी, चायनिस डेशेस आणि फ्रॅन्कीने मेन्यूकार्ड भरलेले होते.

मी अस्वस्थ झालो. आजुबाजूची लोक पंजाबी, चायनिस डेशेसचीच ऑर्डर देत होते. माझी अस्वस्थता हॉटेलमधील वयस्क मॅनेजरने ताडली. तो माझ्याकडे आला म्हणाला, क्या चाहिये?. ‘मटण मसाला, मटण अफगाणी, चिकन बदामी, किधर है. आपके हॉटेल की पहचान तो दिख नहीं रही है’,मी त्याला म्हणालो. तो वयस्क पण अस्वस्थ झाला. म्हणाला , ‘क्या करू साब, यहाँ आनेवाले जो चीज माँगते है वोही रखना पडता है. लेकिन आपको जो चाहिये वो भी है.’ त्यानंतर आलेला मटण मसाला, नान आणून त्यांनी माझ्यासमोर ठेवले. आजही मटण मसालाची तिच चव होती. खाऊन मन आणि जिव्हा तृप्त झाली. पण अजून फार काळ तेथे मटण मसालाची जुनी टेस्ट शिल्लक राहाणार नाही. कारण त्यांचा तो कुक म्हातारा झाला आहे आणि नवे कुक चायनिस पद्धतीनेच मोघलाई डिश बनवतात, अशी आतली माहिती त्या मॅनेजरने दिली. हॉटेलमधून बाहेर पडताना वाईट वाटले. अनुकरण करण्याच्या नादात आपण आपली ओळख विसरून जात आहोत. त्याचे पडसाद आता आपल्या खाद्यपदार्थांवरही उमटत आहेत.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -