घरमहाराष्ट्र२२ दिवसांमध्ये १० लाख विद्यार्थी शाळेत

२२ दिवसांमध्ये १० लाख विद्यार्थी शाळेत

Subscribe

पहिल्या दिवसाच्या तुलनेत शाळेत उपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्या साडेतीन टक्क्यांनी वाढली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असली तरी एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त १९ टक्केच विद्यार्थी शाळेत येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरला ९ ते १२ वीचे राज्यभरातील वर्ग सुरू केले. त्यानुसार २२ दिवसांमध्ये राज्यातील तब्बल १६ हजार ६२० शाळा सुरू झाल्या तर १० लाख ७२ हजार ४९० विद्यार्थी शाळेमध्ये आले. पहिल्या दिवसाच्या तुलनेत शाळेत उपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्या साडेतीन टक्क्यांनी वाढली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असली तरी एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त १९ टक्केच विद्यार्थी शाळेत येत आहेत.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू केल्या. २३ नोव्हेंबरला मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या शहरातील शाळा वगळता राज्यातील शाळा सुरू झाल्या. राज्यातील २२ हजार २०४ शाळांपैकी ९ हजार १२७ शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या. या शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. शाळा सुरू झाल्यातरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्साही होते. मात्र योग्य ती काळजी व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत विद्यार्थ्यंची संख्या वाढवण्याचे शाळांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थी संख्या वाढण्यामध्ये दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर १० दिवसांनी म्हणजे २ डिसेंबरला राज्यातील ११ हजार ३२२ शाळा सुरू झाल्या तर ४ लाख ९१ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. २२ दिवसांनी राज्यातील तब्बल १६ हजार ६२० शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थी संख्याही १० लाख ७२ हजार ४९० वर पोहोचली आहे. राज्यातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण ७० टक्के असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही १९ टक्के आहे.

- Advertisement -

जळगावमध्ये १०० टक्के शाळा सुरू

२३ नोव्हेंबरला एकही शाळा सुरू न होणार्‍या जळगाव जिल्ह्यामध्ये आता १०० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी एकही शाळा सुरू न करणार्‍या नांदेडमध्ये ९९.५ टक्के, परभणीमध्ये ८८ टक्के, धुळे ६५.८ आणि नागपूरमध्ये ५१.७ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत.

या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ६४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. जळगावमध्ये १०० टक्के शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फक्त ५२.३ टक्के इतकी आहे. त्याखालोखाल सोलापूर ५०.९ टक्के, परभणी ४७.६ टक्के, लातूर ३६ टक्के, उस्मानाबाद ३५.४, रत्नागिरी, भंडारा ३१.६ टक्के, गडचिरोली ३१.४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -