घरमहाराष्ट्रदंगलीच्या घटनांवरून आरोप-प्रत्यारोप

दंगलीच्या घटनांवरून आरोप-प्रत्यारोप

Subscribe

छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ मुंबईतील मालवणीत दोन गटात दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. पोलीस प्रशासनाने वेळीच हे प्रयत्न हाणून पाडले असताना या घटनांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी लक्ष्य केले. गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी मागणी त्यांनी केली, तर मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. त्यांना मनातून वाटते की मी गृहमंत्रीपदी राहू नये, पण मी गृहमंत्री राहणार आहे, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.

रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दंगल उसळली होती. येथील अनेक भागांत वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या, तर मुंबईत मालवणी परिसरात रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला. या दोन घटनांवरून सुप्रिया सुळे यांनी शनिवारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisement -

राज्यात होणार्‍या दंगली हे गृह मंत्रालयाचे मोठे अपयश आहे. महाराष्ट्रात दंगली होणे ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृह मंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुळे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

राज्यातील दंगली आणि खासदार संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले पाहिजे. मी राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीदेखील बोलणार आहे. सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे. संजय राऊत हे खासदार आहेत तसेच देशातील मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान करायला हवी, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये बोलताना सुळे यांच्या टीकेचा समाचार घेतला. मला कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. त्यांना मनातून वाटते की मी गृहमंत्रिपदी राहू नये, पण मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार दिला आहे. जे जे चुकीचे काम करतील, त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

मी यापूर्वी पाच वर्षे गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला आहे आणि आताही जे लोक बेकायदेशीर काम करतील, त्यांना मी सोडणार नाही. मी कुणाला घाबरत नाही आणि मी कुणाला दबत नाही. कायद्यानेच वागतो. जे काही काम करायचे आहे तेही कायद्यानेच करतो. हे राज्य कायद्यानेच चालेल, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात होणार्‍या दंगली हे गृह मंत्रालयाचे मोठे अपयश आहे. महाराष्ट्रात दंगली होणे ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृह मंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी

मला कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. त्यांना मनातून वाटते की मी गृहमंत्रीपदी राहू नये, पण मी गृहमंत्री राहणार आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -