घरफिचर्ससारांशमद्यपाश हा जीवघेणा आजार

मद्यपाश हा जीवघेणा आजार

Subscribe

दारूच्या एका घोटाने सकाळची सुरुवात होऊन दिवसभर दारू पिऊन कोठेतरी पडून राहणे एवढेच माझे विश्व बनले होते. मला लागलेले हे व्यसन म्हणजे एक आजार आहे. ह्याचे परिणाम वाईट होतात हे ऐकत होतो, परंतु ते स्वीकारण्यास मन धजावत नव्हते. ते सगळे गमावून बसलो होतो. त्यातच भर म्हणजे वडिलांचा झालेला अकाली मृत्यू व पत्नीने दिलेली घटस्फोटाची नोटीस. काय दिले ह्या दारूच्या व्यसनाने? तर फक्त हतबलता, नैराश्य. तरीही मी ते स्वीकारत नव्हतो. हतबलता मान्य करण्यास तयार नव्हतो. कारण तीच त्यावेळची माझी जीवनशैली होती.

–मद्यमुक्त अनामिक

२० वर्षांपूर्वी अशीच एक घटना माझ्याबाबत घडली. मी स्वतःच्या हाताने माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. एका चांगल्या सुखवस्तू कुटुंबात जन्म घेतला असताना, प्रेम करणारे आईवडील असताना मी दारूवर प्रेम करू लागलो आणि दारूचा माझ्या जीवनावर इतका विलक्षण प्रभाव पडला की माझ्या जीवनाचा लगाम दारूच्या नियंत्रणात कधी गेला हे कळलेच नाही. दारू पिण्यास मिळावी म्हणून चोर्‍या-लबाड्या, फसविणे, खोटे बोलणे असे प्रकार करू लागलो. त्यामुळे मित्र-परिवार, नातेवाईक व आईवडील ह्यांचा माझ्या प्रति विश्वास गमावून बसलो. कारण त्यावेळी नाती, भावना, प्रेम ह्या संपूर्ण गोष्टींचा विसर तर पडलाच होता व चांगले छंदही विसरलो होतो.

- Advertisement -

दारूच्या एका घोटाने सकाळची सुरुवात होऊन दिवसभर दारू पिऊन कोठेतरी पडून राहणे एवढेच माझे विश्व बनले होते. मला लागलेले हे व्यसन म्हणजे एक आजार आहे. ह्याचे परिणाम वाईट होतात हे ऐकत होतो, परंतु ते स्वीकारण्यास मन धजावत नव्हते. ते सगळे गमावून बसलो होतो. त्यातच भर म्हणजे वडिलांचा झालेला अकाली मृत्यू व पत्नीने दिलेली घटस्फोटाची नोटीस. काय दिले ह्या दारूच्या व्यसनाने? तर फक्त हतबलता, नैराश्य. तरीही मी ते स्वीकारत नव्हतो. हतबलता मान्य करण्यास तयार नव्हतो. कारण तीच त्यावेळची माझी जीवनशैली होती.

जून २०१० मध्ये म्हणजेच तब्बल १२-१३ वर्षांपूर्वी मी एक रुग्ण म्हणून एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रवेश घेतला आणि खर्‍या अर्थाने माझ्या व्यसनमुक्त जीवनाचा पाया घालण्यास सुरुवात झाली. रोजचा दिनक्रम आखलेला होता. प्रत्येक थेरपी, योगा, ए.ए.च्या सभा यातून माझ्या हातून घडलेल्या चुकांची जाणीव होत होती. मद्यपाश हा आजार कसा धूर्त, कावेबाज व घोटाळ्यात टाकणारा आहे ह्याची जाणीव मनावर बिंबत होती. ह्या सर्वांचा एक चांगला परिणाम मनावर होत होता, तो म्हणजे माझा हरवलेला आत्मविश्वास प्रत्येक दिवसागणिक परत मिळत होता. पूर्वीचा एकलकोंडेपणा जाऊ लागला होता व सगळ्यांच्यात मिसळायला लागलो होतो. माझ्या मनातील चांगल्या वाईट गोष्टी किंवा झालेल्या चुकांची आपल्या रोजनिशीत नोंद करू लागलो किंवा समुपदेशकाशी मनमोकळेपणाने बोलू लागलो. खर्‍या अर्थाने व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर आपले जीवन आपण कसे व्यवस्थित हाताळू शकू याबाबत सतत जागरूकतेने विचार करू लागलो.

- Advertisement -

ह्या सर्व प्रक्रियेतून जाताना माझ्यात घडत असलेले बदल मला जाणवत होते. त्यातील काही पुढीलप्रमाणे : १) माझा आत्मविश्वास वाढीस लागला. २) चुकांची त्वरित दखल घेऊ लागलो व त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून दक्षता घेऊ लागलो. ३) प्रत्येक दिवसाचा आराखडा तयार केला व त्याप्रमाणे प्रत्येक काम करू लागलो. ४) प्रत्येकाशी सुसंवाद ठेवू लागलो व त्यांची मते व्यवस्थित समजावून घेऊन पटल्यास संमती देऊन त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल घडवू लागलो. ५) रागावर, क्रोधावर नियंत्रण ठेवू लागलो. ६) थांबलेली दारू थांबलेली राहण्यासाठी ए.ए.च्या साप्ताहिक सभांना नियमितपणे जाऊ लागलो.

वरील गोष्टींमुळे आज बाह्य जगात वावरताना किंवा कुठल्याही ताणतणावाशी सामना करताना कुठल्याही प्रकारचे दडपण मनावर नसते. कुठल्याही चांगल्या गोष्टींचा सहजपणे आस्वाद घेऊ शकतो. आज वैवाहिक जीवनदेखील सुसंवाद व विश्वास ह्या दोन चाकांवर स्थिर आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे एकमेकाला समजून घेण्याची प्रवृत्ती हे होय. आज दिवसागणिक माझ्यात जे चांगले बदल होत आहेत किंवा त्यात परिपक्वता येत आहे याचे सर्व श्रेय अल्कोहोलिक्स अनोनिमसला (ए.ए.) व माझ्या कुटुंबाला जाते. त्यासाठी मला सतत जागरूक राहावे लागणार आहे आणि माझी बदललेली जीवनशैली तशीच ठेवण्याकरिता माझ्या आयुष्याचे लगाम माझ्या स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याकरिता मला श्रद्धा व सबुरी या दोन वचनांचा सतत अवलंब करावा लागणार आहे. ए.ए.च्या साप्ताहिक सभा आयुष्यभर कराव्या लागणार आहेत. तरच मी मद्यमुक्त, आनंदी व माझ्या कुटुंबीयांसमवेत सुखी व समाधानी राहू शकेन हे मला आता पटले आहे आणि यामुळेच ही बदललेली जीवनशैली सुखावह होणार आहे.

वाचकांनो, दारू ही तुमची किंवा तुमच्या कुटुंबीयांची समस्या झाली आहे का? दारू ही तुमची किंवा तुमच्या मित्रांची समस्या झाली आहे का? या प्रश्नांची उत्तरे होय असल्यास विनामूल्य मदतीसाठी ताबडतोब अल्कोहोलिक अनोनिमस (मोबाईल- ९३७०६९७९०८ / ८७८८४८४६६२)
या संस्थेशी संपर्क साधा व मदत मिळवा.

–(लेखक अल्कोहोलिक अनोनिमस संस्थेचे सदस्य आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -