घरमहाराष्ट्रघोटाळेबाजांना तुरुंगात टाकणारच-आदित्‍य ठाकरे

घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणारच-आदित्‍य ठाकरे

Subscribe

ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर भव्‍य मोर्चा,सत्ताधाऱ्यांसह प्रशासकावर भ्रष्‍टाचाराचा आरोप

मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांची विकासकामांच्या नावाखाली लूट करणार्‍या खोके सरकारच्या,अधिकार्‍यांच्या फायली तयार आहेत. राज्यात आमचे सरकार पुन्हा आल्यावर मुंबई महापालिकेची लूट करणार्‍या घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार म्हणजे टाकणारच. मुंबईची लूट करणार्‍या मिंधे खोके सरकारला धडा शिकवणार. दिल्लीश्वरांसमोर कटोरा घेऊन झुकणार नाही.

वांद्रे येथील शिवसेनेच्या शाखेवर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बुलडोझर फिरवणार्‍यांवर आम्ही बुलडोझर फिरवणार, असा इशारा युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांसह मुंबई पालिकेतील प्रशासनाला दिला. मुंबई महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मनमानीपणामुळे हजारो कोटींच्या रस्ते, विकासकामे, सुशोभीकरण आदी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर शनिवारी सायंकाळी पावसातच भव्य मोर्चा काढला होता.

- Advertisement -

शनिवारी १ जुलै रोजी मुंबई महापालिकेला सार्वजनिक सुट्टी आहे हे ज्ञात असतानाही शिवसेना (उबाठा) युवानेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातर्फे मोर्चा काढला गेल्याने शिवसेनेचा हा मोर्चा म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेले शक्तीप्रदर्शन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली.

शिवसेना ठाकरे गटाकडून शनिवारी दुपारी ४.३०वाजता मेट्रो सिनेमा येथून घोषणा देत मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवानेते आदित्य ठाकरे हे मोर्चात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे, फलक घेऊन शेकडोंच्या संख्येने शिवसैनिकांनी पालिकेसमोर धडक दिली. त्यावेळी पालिकेसमोरील वातावरण अवघे भगवेमय झाले होते.

- Advertisement -

शिवसेनेचे माजी मंत्री, नेते, खासदार, आमदार व माजी नगरसेवकांचा सहभाग
या मोर्चात, शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, खा.अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, आ. सुनील शिंदे, आ. प्रकाश फातर्पेकर, आ. सचिन अहिर, उप नेत्या मीनाताई कांबळे, उप नेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, स्नेहल जाधव, महादेव देवळे अन्य माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिल्लीसमोर झुकणार नाही
यावेळी आदित्य ठाकरे यांनी, दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नसून घेता त्यांच्यावर व मुख्यमंत्री एकणक्तह शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेवर भाजपच्या दिल्लीश्वरांची ( पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा )नजर आहे. तसेच, खोके सरकार भाजपसोबत युती करून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेऊ पाहत आहेत. वास्तविक, मुंबई दिल्लीसमोर कटोरा घेऊन उभी राहणार नाही, मुंबई कधी झुकली आणि कधी झुकणार नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार, फाईली तयार
मुंबई महापालिकेत सत्तेवर येण्यापूर्वी पालिका ६०० कोटी तुटीत होती, मात्र आम्ही सत्तेवर आल्यावर आज पालिकेच्या विविध बँकांतील मुदत ठेवी तब्बल ९२ हजार कोटींवर गेल्या आहेत, मात्र या हजारो कोटींच्या ठेवींवर दिल्लीश्वर व मिंधे सरकारचा डोळा आहे. मिंधे सरकारने पालिकेच्या हजारो कोटींच्या मुदत ठेवींची रस्ते, सुशोभिकरण, स्ट्रीट फर्निचर, खडी खरेदी आदी विकास कामांच्या नावाखाली उधळपट्टी केली आहे, असा आरोप करीत आदित्य ठाकरे यांनी, या घोटाळ्यांच्या फाईली तयार केल्या आहेत. मिंधे सरकारने रस्ते, खडी खरेदी आदी कामे स्वतःच्या मित्र असलेल्या कंत्राटदारांना देण्यासाज कुभांड रचले होते, मात्र आमचे सरकार आल्यावर मुंबई महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी व घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार म्हणजे टाकणारच, असा आरोप करीत आदित्य ठाकरे यांनी, महापालिकेत रस्ते,स्ट्रीट फर्निचर, खडी खरेदी, सॅनिटर नॅपकिन मशीन खरेदी यामध्ये कशाप्रकारे घोटाळे झाले याचा थोडक्यात पाढा वाचला.

सरकार आल्यावर त्यांच्यावर बुलडोझर फिरवणार
वांद्रे येथील शिवसेनेच्या जुन्या शाखेला अनधिकृत ठवरत मिंधे सरकारच्या आदेशाने पालिकेने बुलडोझर फिरवण्यात आला. शाखा तोडली तरी हरकत नव्हती, मात्र त्या शाखेमधील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर त्यांनी बुलडोझर फिरवला, त्यांना सोडायचे नाही. आपले सरकार आल्यावर आपण त्यांच्यावर बोलडोझर फिरवणार आहोत, असा इशाराही त्यांनी पालिका व शिंदे सरकारला दिला.

घोटाळयांच्या चौकशीसाठी राज्यपाल , लोकायुक्त मागणी करणार
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर सत्ता मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना, खोके सरकारकडून दिल्लीच्या इशारावर लूट चालविली आहे. मनपाचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत, परंतु बिल्डरांसाठी रेड कारपेट टाकतात, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबई मनपावर अली बाबा आणि चाळीस चोरांचा दबाव आहे. मुंबई महापालिकेतील ९२ हजार कोटींच्या मुदतठेवी असताना त्यापैकी ६ हजार कोटींची रस्ते, स्ट्रीट फर्निचर, खडी खरेदी, सुशोभिकरण यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आम्ही जागरूक राहून ६०० कोटी आणि ४०० कोटी असे हजार कोटी रुपये वाचवले. मात्र पालिकेतील घोटाळ्याची नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे आणि लोकायुत्त यांच्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे, मात्र आगोदरच राज्यापाल भगतसिंह कोशयारी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

भाजपची टीका म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा
आमचा भ्रष्टाचार विरोधातील मोर्चा म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा म्हणणारे भाजपवाले मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असताना आमच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले होते. त्यावेळी त्यांना भ्रष्टाचार आठवला नाही. मात्र आता ते आमच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत आहेत, त्यावेळी त्यांनी काय तोंडाला चिकटपट्टी लावली होती का ? असा सवाल शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी यावेळी केला.

मुंबई महापालिका मुख्यालय येथे शिवसेनेचा मोर्चा असल्यामुळे पालिकेसमोरच शनिवारी सकाळपासूनच स्टेज बांधण्याचे काम चालू होते. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षितततेच्या दृष्टीने मुंबई महापालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. परिणामी सकाळी १०.३० पासून सदर मार्गावरील बेस्ट बस, इतर वाहतूक पर्यायी डी.एन रोड मार्गे महात्मा फुले मंडईकडून मेट्रोकडे परावर्तित करण्यात आली होती. त्याचा बेस्ट प्रवाशांना काही प्रमाणात त्रास झाला. मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती, मात्र ७ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेतील २०१७ पासूनची पाच वर्षांची प्रशासकीय मुदत संपली. त्यानंतर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही.

सत्ताधारी शिवसेनेत एक वर्षापूर्वी राजकीय भूकंप होऊन नेते व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक ४० आमदारांसह भाजपची साथ घेऊन शिवसेना व भाजप युतीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर एक वर्षे सत्तेपासून दूर ठाकरे गटाने सध्या पालिकेच्या मार्फत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत प्रथमच पालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर सभेत होण्यापूर्वी बुलढाणा येथे बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चाला येण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी, काळबादेवी बँक येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावर त्यांनी आपल्या भाषणात, भूत, पिशाच यांची बाधा जावी, म्हणून बजरंग बलीचे दर्शन घेतल्याची कोटी केली.

घोषणाबाजी
(१) मुंबईची तिजोरी लुटतय कोण
दिल्लीचे चोर दोन

(२) तोडून एफडी मुंबईची
चाकरी करतात दिल्लीची

(३)चाळीस बोके, ५० खोके
मुंबईसाठी नॉट ओके

(४) शिवसेना अंगार है
बाकी सब भंगार है

(५) मुंबई आमच्या साहेबांची
नाही कोणाच्या बापाची

(६)हा आवाज कोणाचा, शिवसेनेचा

(७) आलाय यांना सत्तेचा माज
खोके सरकार धोकेबाज

दरोडेखोर मुंबई महापालिकेच्या बाजूला उभे होते-मुख्‍यमंत्री शिंदे

दरोडेखोरच मुंबई महापालिकेच्या बाजूला उभे राहून बोलत होते, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाकरे गटाला दिले. ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेवर काढलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका करताना, त्यांनी चुकीच्या जागी मोर्चा काढला. मातोश्री-१ ते मातोश्री-२पर्यंत मोर्चा काढायला हवा होता. शनिवारी काही जणांनी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला. भाजपकडूनही मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु बुलढाण्यात बस अपघात झाल्यामुळे आम्ही हा मोर्चा स्थगित केला. ज्यांना संवेदना नाही आणि ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना राजकारण करू द्या, पण त्यांनी मोर्चा मातोश्री-१ ते मातोश्री- २ असा काढायला हवा होता. कारण सगळे तिथेच झाले आहे. सगळे त्यांनीच केले, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -