घरताज्या घडामोडीशिवसेनेसोबत कायम राहायचेय स्थानिक पातळीवर जुळवून घ्या!

शिवसेनेसोबत कायम राहायचेय स्थानिक पातळीवर जुळवून घ्या!

Subscribe

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची खलबते झाल्याची माहिती आहे.

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहे; पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, अशा स्पष्ट सूचना अजित पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या. लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहितीही अजितदादांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी यापुढील सर्व निवडणुका एकत्रितरित्या लढण्याचे संकेत आधीच दिले होते..

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या दिग्गजांची खलबते
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाच या बैठकीला बोलावण्यात आले होते.

पराभूत उमेदवारांसोबत चर्चा
पराभूत उमेदवारांना मिळालेली मते, त्यांचे मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये या उमेदवारांची भूमिका काय असेल? याचीही चर्चा या बैठकीत होऊन त्या अनुषंगाने जबाबदार्‍यांचं वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आऊट गोईंग सुरु होऊ नये म्हणून
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने अनेकांना आपण पक्षात अडगळीत फेकल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बरेच पदाधिकारी नाराज आहे. त्यातच भाजपने सत्ताधारी पक्षातील मिळेल त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश देण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने राष्ट्रवादीला आगामी काळात गळती लागू नये म्हणून या बैठकीच्या माध्यमातून पराभूतांना महत्त्व देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु असल्याचे राजकीय जाणकार मानतात.

शिवसेनेची भूमिका काय?
महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित निवडणुका लढवत आहोत आणि भविष्यातही कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकत्रित कार्यक्रम राबवणार आहोत, त्यामुळे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना यासंबंधी आदेश दिले असतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -