घरताज्या घडामोडीvideo : कामावर जायला मोटरसायकल सोडून थेट विकत घेतला घोडा, व्हिडिओ व्हायरल

video : कामावर जायला मोटरसायकल सोडून थेट विकत घेतला घोडा, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर झाला आहे. दैनंदिन प्रवासासाठी इंधनाच्या खर्चाच्या निमित्ताने खिशाला लागणाऱ्या कात्रीमुळेच सर्वसामान्यांना प्रवास परवडेनासा झाला आहे. त्यामध्ये इंधनाच्या वाढत्या खर्चावर पर्याय म्हणून औरंगाबादच्या एका पठ्ठ्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. प्रवासासाठी चक्क घोड्याचा वापर करत ही व्यक्ती रस्त्यावरून निघाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. बस किंवा रिक्षाच्या पर्यायापेक्षा कोरोनाच्या काळात घोड्यावरूनच जाण्याचा सुरक्षित पर्याय असल्याचे ती व्यक्ती सांगते. कोरोना काळातच खरेदी केलेला घोडा हा रोजच्या वाहतुकीचा पर्याय झाल्याचा अनुभव या पठ्ठ्याने सांगितला. प्रवासाचा स्वस्त पर्याय म्हणून मोटरसायकल सोडत थेट घोडाच विकत घेऊन मी आता प्रवास करत असल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले.

- Advertisement -

औरंगाबादच्या शेख युसुफने हा घोड्याचा पर्याय वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे निवडला आहे. युसुफ हा एका फार्मसी कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. पण वाढत्या महागाईला तोंड देतानाच प्रवासासाठी घोड्याच्या पर्यायाचा वापर हा चर्चेचा विषय ठरतो आहे. सध्या औरंगाबाद येथे डिझेलचा दर लीटरमागे १०० रूपये आहे. तर पेट्रोलसाठी ११५ रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळेच वाढत्या इंधनाचा खर्च परवडेनासा झाल्यानेच मी थेट घोडाच खरेदी केल्याचे युसुफ सांगतो. युसुफकडे असलेली मोटार सायकल त्याने चालवायची सोडून दिली. लॉकडाऊनमध्ये अनेक दिवस गॅरेज बंद असल्याने मला मोटारसायकल दुरूस्त करण्यासाठीचा पर्याय मिळाला नाही. अशातच मी ४० हजार रूपये देऊन थेट घोडाच खरेदी केल्याचे त्याने सांगितले.

नोकरीच्या निमित्ताने युसुफला दररोज १५ किलोमीटर इतके अंतर पार करत कामाच्या ठिकाणी जावे लागते. लॉकडाऊनमध्ये सगळ ठप्प असताना घोड्याचा सर्वात सुरक्षित पर्याय होता. तेव्हापासूनच मी घोडा वापरत कामाच्या ठिकाणी पोहचलो. त्यामुळेच घोड्याचा वापर करत मी दररोज कामाच्या ठिकाणी जाऊ लागल्याचा अनुभव त्याने सांगितला.

- Advertisement -

एरव्ही रोजच्या शॉपिंगपासून ते एखाद्या समारंभाला जाण्यासाठीही मी घोड्याचाच वापर करतो. मोटारसायकलला येणारा खर्च पाहता घोड्याचा प्रवास अतिशय स्वस्त असल्याचेही त्याने सांगितले. पण त्याचवेळी घोड्याची निगाही चांगली राखत असल्याचे त्याने सांगितले. तसेच अनेकांना मी घोडा वापरत असल्याचे पाहून आनंदच होतो. दुसरीकडे डिझेल आणि पेट्रोलचे दर रोखून धरता येणार नाही, त्यामुळे आपला मार्ग आपल्याला काढावाच लागेल असेही युसुफने सांगितले.

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -