घरदेश-विदेशलडाखमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक

लडाखमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक

Subscribe

अधिकार्‍यासह २० जवान शहीद, चीनच्या ४३ सैनिकांना धाडले यमसदनी

लडाखच्या गलवान खोर्‍यात भारत-चीन सीमेवर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या हिंसक चकमकीत कर्नल दर्जाच्या अधिकार्‍यासह भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कर्नल संतोष बाबू, हवालदार पलानी, शिपाई ओझा अशी शहीद झालेल्या भारतमातेच्या तीन पुत्रांची नावे आहेत. मात्र, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून चीनचेही ४३ जवान ठार केलेे आहेत. दोन्ही देशांमध्ये जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. मंगळवारी रात्री तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत दिर्घ चर्चा केली. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यांच्यातही लडाखमधील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

एकीकडे भारत-चीन सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी प्रयत्न करत आहेत. यातच आता दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्यामुळे तणाव आणखीच वाढल्याचे दिसून येते. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय जवानांनी दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच, भारतीय जवानांनी आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

मागच्या काही दिवसात दोन्ही देशांच्या सैन्य अधिकार्‍यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार चिनी सैन्य गलवान खोर्‍यातील पेट्रोलिंग पॉईंट १४,१५ आणि १७ ए मधून मागे हटेल असं ठरलं होतं. चिनी सैन्य मागे सरकत देखील होतं. पण पूर्णपणे त्यांनी ताबा सोडला नव्हता. काल चिनी सैन्य पूर्णपणे माघारी फिरेल असा निर्णय झाला होता. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकार्‍यांमध्ये ठरल्यानंतरही चिनी सैन्याने मागे फिरण्यास नकार दिला. त्यानंतर ही हिंसक झडप झाली.

दगड, नाल, रॉडने झाला हल्ला
चिनी सैन्य आपल्या सोबत लोखंडी नाल आणि रॉड घेऊन आले होते. त्यांनी प्रथम भारतीय सैन्यावर दगडफेक केली. त्यानंतर नाल आणि रॉडने हल्ला केला. भारतीय सैनिकांनी त्यांना त्याच शस्त्रांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूचे अनेक सैनिक जखमी झाले. दोन्ही सैन्यांच्या अधिकार्‍यांची बैठक सुरू होती. त्यावरही चिनी सैन्याने दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

चीनच्या उलट्या बोंबा
सोमवारी भारतीय जवानांनी अवैधरित्या सीमारेषा ओलांडून चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. तसेच दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीचंही उल्लंघन केलं. यामुळे काही गंभीररित्या झटापट झाली, अशी माहिती ग्लोबल टाईम्सने चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्याने दिली आहे.

४५ वर्षांनंतर वाहिले रक्त
१९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या. १९७५ साली चीनला लागून असलेल्या सीमेवर गोळीबार झाला. त्यामध्ये भारताचे चार जवान शहीद झाले होते. त्यानंतर मात्र कधीही भारताच्या बाजूला एकही जवान शहीद झाला नव्हता. पण काल रात्री ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच चीन बरोबर झालेल्या संघर्षात भारताने आपले २० वीरपुत्र गमावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -