घरताज्या घडामोडीभाजपनं पुन्हा मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंना नाकारलं; परिषदेसाठी ४ नवीन नावं!

भाजपनं पुन्हा मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंना नाकारलं; परिषदेसाठी ४ नवीन नावं!

Subscribe

एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आणि त्याविरोधातला लढा सुरू असताना दुसरीकडे आगामी येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांची देखील तयारी जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सदस्यत्वासाठी ही निवडणूक व्हावी, यासाठी महाविकासआघाडीकडून मोठे प्रयत्न केले गेले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या निवडीसोबतच या निवडणुकीत लक्ष होतं ते भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे. कारण विधानसभा निवडणुकीवेळी संधी न मिळालेल्या पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांचं आणि पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात येण्याची शक्यता होती. मात्र, आता ही शक्यता मावळली असून भाजपनं डॉ. अजित गोपछेडे, नागपूर भाजपचे नेते प्रवीण दटके, विधानसभा निवडणुकीआधी भाजपवासी झालेले गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ज्येष्ठांना पक्षाने नाराज केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

खडसे, मुंडे, तावडेंनी उघड केली होती नाराजी!

विधानसभा निवडणुकांवेळी उमेदवारी न मिळाल्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दिसून आली होती. विशेषत: पक्षाचे राज्यातले सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी तर उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अनेकदा या नाराजांच्या होत असलेल्या भेटीगाठींमुळे भाजपमध्ये बंडखोरी होऊन फूट पडते की काय? असं देखील चित्र निर्माण झालं होतं. खडसेंनी बरेच प्रयत्न करून देखील त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली होती. फडणवीस सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना देखील डावलण्यात आलं. तर शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे आणि ऊर्जामंत्री राहिलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील तिकीट नाकारून इतरांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे या चौघांची नाराजी असल्याचं स्पष्ट झालं होतं.

- Advertisement -

bjp mlc election candidates list

फडणवीसांचा वरचष्मा कायम!

विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी या चौघांपैकी कुणाला संधी मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यातून त्यांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, भाजपने डॉ. अजित गोपछेडे (भाजपच्या राज्याच्या वैद्यकीय आघाडीचे संयोजक), प्रवीण दटके(नागपूरचे माजी महापौर), गोपीचंद पडळकर (धनगर समाजाचे नेते) आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची नावं जाहीर करून पुन्हा एकदा ज्येष्ठांना नाकारलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा अजूनही महाराष्ट्र भाजपवर वरचष्मा कायम आहे हेच यातून सिद्ध होत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -