घरमहाराष्ट्रपेणमध्ये भाजपचे कमळ फुलले

पेणमध्ये भाजपचे कमळ फुलले

Subscribe

राष्ट्रवादीचा शेकापला ठेंगा?

भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पेण विधानसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी विजय मिळवत शेकापची विजयी हॅट्ट्रिक रोखण्याची किमया केली आहे. रवींद्र पाटील यांनी शेकापचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा तब्बल 23 हजार ५९५ मतांनी पराभव केला. यावेळी या मतदारसंघात काँग्रेसची डाळ शिजली नसून पक्षाच्या मतांपेक्षा नोटाच्या मतांची संख्या अधिक आहे. दरम्यान, शेकापने ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने लढवली असली तरी राष्ट्रवादीकडून शेकापला फारशी मदत झाली नसल्याची चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे.

रवींद्र पाटील यांना १ लाख 11 हजार 309 मते मिळाली. शेकापचे धैर्यशील पाटील यांना 87 हजार 714, तर काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांना अवघी 2 हजार 280 मते मिळाली. मतदारसंघात 14 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप, शेकाप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि नऊ अपक्ष असे उमेदवार उभे होते. यामध्ये मुख्य लढत ही शेकाप आणि भाजपमध्येच झाली. या निवडणुकीत 2 हजार 442 मतदारांनी चक्क नोटाला पसंती दिली.

- Advertisement -

रवींद्र पाटील यांनी सुरूवातीपासून ते थेट 27 व्या फेरीपर्यंत मताधिक्य कायम ठेवले. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या पेण पूर्व विभागात भाजपने जशी जोरदार मुसंडी मारली तसे पाली, नागोठणे, रोहे विभागाने देखील भाजपलाच कौल दिला. भाजप-शिवसेना युतीच्या नियोजनबद्ध प्रचाराबरोबरच गेल्या 10 वर्षांत विकास कामे करण्यात आलेले अपयश शेकापच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहे. वाढलेला मतदानाचा टक्का भाजपच्या पथ्यावर पडला आहे.

निकालानंतर रवींद्र पाटील यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी ‘आपलं महानगर’ला दिली.

- Advertisement -

विजयी उमेदवार – रवींद्र पाटील (भाजप)
मिळालेली मते – १,11, 309
पराभूत उमेदवार – धैर्यशील पाटील (शेकाप)
मिळालेली मते – 87,714

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -