घरमहाराष्ट्रभाजपचीही आता स्वबळाची भाषा

भाजपचीही आता स्वबळाची भाषा

Subscribe

प्रदेशाध्यक्ष दानवेंनी घेतला आढावा

राज्यातील सत्ताधारी युतीत सारे काही आलबेल नाही, हे आता उघड होऊ लागले आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने जोरदार टीका करूनही युतीसाठी मागे धावणार्‍या भाजपने आता स्वबळाची भाषा सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठी आढावा घ्यायला सुरूवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार पक्षाला स्वबळाचा निर्णय घ्यावा लागला तर आश्चर्य वाटायला नको, असे त्यांनी सूचकपणे सांगितले.

सत्तेत असूनही फसवणूक करणार्‍या भाजपला धक्का देण्यासाठी सेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा भाजपला दिला होता. भाजपकडून सातत्याने होणार्‍या टीकेनंतर सेनेने त्या पक्षाविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सेनेविरोधी कोणी बोलू नका, अशा सूचना आपल्या पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांना देण्यात आल्या होत्या. यानंतरही सेनेने भाजपवर टीका करणे सोडले नाही. लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाही सेनेकडून सबुरी राखली जात नसल्याबद्दल भाजपत नाराजी होती. यातच युतीबाबत सेनेकडून कुठलीही चर्चा होत नसल्याने आता करायचे काय, असा प्रश्न भाजप नेत्यांपुढे निर्माण झाला आहे. यातूनच युती न झाल्यास फटका बसेल, असे मुख्यमंत्र्यांनी कालच जळगावमध्ये सूचकपणे मान्य केले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही स्वबळाची भाषा सुरू केली आहे. मागील निवडणुकीत बरोबर असलेल्या घटक पक्षांना व समविचारी पक्षांना पुढील निवडणुकीत बरोबर घेऊनच निवडणुका लढण्याची आमची भूमिका आहे. बरोबर येण्यासाठी आमचे सर्वांनाच आमंत्रण आहे. शिवसेनेबाबत आमचा चांगला अनुभव असून, मंत्रिमंडळात सर्व निर्णय एकमतानेच घेतो. त्यांच्या मनात आमच्याविषयी द्वेष आहे, असे आम्हाला वाटत नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर योग्यवेळी शिवसेनेसह सर्व घटक पक्षांशी चर्चा होईल. याउपरही कोणाची स्वतंत्र भूमिका असेल, तर आमचीही स्वबळाची तयारी आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले. हे करण्याआधी दानवे यांनी पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी स्वबळाची तयारी आहे, असे म्हटले.

याबाबत ‘महानगर’ने रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचे पर्याय खुले आहेत. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. मर्यादा ओलांडून काहीही होऊ शकणार नाही. अशावेळी आम्हाला आमचा विचार करावाच लागेल, असे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -