घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेचे ‘एकच लक्ष्य-एक लक्ष’

मुंबई महापालिकेचे ‘एकच लक्ष्य-एक लक्ष’

Subscribe

विद्यार्थीसंख्येत वाढ करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, महापालिका शाळांत 1 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे लक्ष्य

इंग्रजी व सीबीसीएसई बोर्डाच्या वाढत्या प्रभावामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील प्रवेशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठी घट झाली आहे, मात्र आता मुंबई महापालिकेतील शाळांमधील प्रवेशामध्ये वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. यावर्षी मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये विविध इयत्तांमध्ये तब्बल एक लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेने ठेवले आहे. त्यासाठी महापालिकेने 18 तारखेपासून ‘मिशन अ‍ॅडमिशन ः एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम हाती घेत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार पाच दिवसांमध्ये 11 हजार 500 पेक्षा जास्त प्रवेश झाले आहेत.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. मुंबई महापालिकेच्या 1,150 शाळांमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंत अंदाजे तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील दहावीचा निकाल २०१९च्या ५३.१४ टक्के निकालावरून २०२०मध्ये थेट ९३.२५ टक्के व २०२१मध्ये १०० टक्के इतका लागला होता. यातून महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच महापालिकेकडून मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि आयजीसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. सध्या असलेल्या 14 शाळांमध्ये 800 जागा आहेत.

- Advertisement -

शाळांची वाढती गुणवत्ता व अन्य बोर्डांच्या सुरू करण्यात येणार्‍या शाळा या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता पालिकेच्या शाळांमध्ये एक लक्ष विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी महापालिकेकडून ‘मिशन अ‍ॅडमिशन ः एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम हाती घेतली आहे. 18 एप्रिलपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या विविध शाळांमध्ये आतापर्यंत 11 हजार 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. ही प्रवेश प्रक्रियेची मोहीम ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे. सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी आणि शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकवर्ग ही मोहीम राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पालिकेकडून पुरवल्या जाणार्‍या सुविधा
शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, डिजिटल क्लासरूम, अद्ययावत क्रीडांगणे, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, टिंकरींग लॅब, लघू विज्ञान केंद्र, विज्ञान कुतूहल भवन, अद्ययावत डेस्क-बेंच, विनामूल्य शैक्षणिक सहली, शालेय पोषण आहार, शालेयपयोगी साहित्य, गणवेश, बूट व मोजे, वह्या, रेनकोट/छत्री, स्कूलकीट व सँडल आदी मिळून सुमारे २७ शालेय वस्तू विनामूल्य पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांना बेस्ट बसचा मोफत प्रवास, ८वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता, सॅनिटरी नॅपकिन व व्हेंडिंग संयंत्र.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -