घरक्राइमलाचखोर बहिरमचा चालकही चर्चेत; त्याच्या नावे जमिनी, हॉटेल, बंगला ?

लाचखोर बहिरमचा चालकही चर्चेत; त्याच्या नावे जमिनी, हॉटेल, बंगला ?

Subscribe

नाशिक : लाचखोर तहसीलदार नरेश बहिरमला रंगेहाथ पकडल्यानंतर त्र्यंबक तहसीलदारांच्या अशासकीय वाहन चालकाचे कारनामे देखील चर्चेत आले आहेत. या चालकाचे बहिरम याच्याशी दैनंदिन साटेलोटे असल्याची चर्चा असून, त्याच्या कथा आता चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत.

तब्बल १५ वर्षांपासून त्र्यंबक तहसीलदारांच्या वाहनावर खासगी चालक म्हणून काम करणार्‍या या चालकाने तहसीलदारांच्या वरदहस्ताने त्र्यंबक तालुक्यात मोठी माया जमवल्याचे बोलले जाते. हा चालक बहिरमच्या वाहनावरही कार्यरत होता. चालकाच्या लिलया कारनाम्यांमुळे तो बहिरमच्या गळ्यातील ताईत बनल्याचीही चर्चा आहे. प्रत्येक तहसीलदाराचे अशासकीय सारथ्य त्याने अतिशय चोखपणे केल्याचे अनेक किस्से त्र्यंबकमध्ये चर्चिले जात आहेत. त्यामुळे बहिरमनंतर आता या चालकाचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

त्र्यंबक तालुक्यात तहसीलदारापेक्षा या चालकाच्या नावाची चर्चा आहे. प्रारंभी बचतगटाचे काम करणारा चालक काम करू लागला. काही वर्षांपूर्वी तो त्र्यंबक तहसीलदारांच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून नियुक्त झाला. तेव्हापासून आतापर्यंत अशासकीय चालक म्हणून तोच तहसीलदारांच्या वाहनांचे सारथ्य करत असल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबक तालुक्यात तहसीलदार म्हणून बदलून जाणार्‍या प्रत्येक तहसीलदाराला या चालकानेे भुरळ घातली. त्र्यंबक तहसीलदारांची अनेक अशासकीय कामे हा पठ्ठ्या लिलया पार पाडतो. कुठून काय घ्यायचे हे इत्यंभूत माहित असल्याने तहसीलदारांचा बराचसा अशासकीय कारभार हाच पठ्ठ्या सांभाळत असल्याचेही समजते. या व्यक्तीचे कारनामे संपूर्ण जिल्ह्यात चवीचवीने चर्चिले जात आहेत. त्र्यंबक तहसीलदार कार्यालयाशी संबधित सर्व सेटिंग्ज हा चालकच करत असल्याने त्याला प्रतितहसीलदारांचा अघोषित दर्जा प्राप्त झाला आहे.

चालकाच्या नावावर जमिनी, हॉटेल, बंगला

गेल्या १५ वर्षांपासून हा खासगी चालक तहसीलदारांच्या वाहनावर काम करत असल्याने त्याने जमवलेली माया डोळे पांढरे करणारी आहे. साधा वाहनचालक असला तरी त्याच्या नावावर अनेक तहसीलदारांनी माया जमविली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचा त्र्यंबकमधील बंगलादेखील अलिशान असून, त्र्यंबकरोडवरील एक मोठे हॉटेल त्याच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. या वाहनचालकाने त्र्यंबक तालुक्यातील पेगलवाडी, अंजेनेरी शिवारात कोट्यवधी रूपयांचे भूखंड घेतल्याचे समजते. तालुक्यातील गौण खनिजाचे हप्ते, जमिनीच्या वादातील मध्यस्थी तसेच विविध सेटिंगमार्फत त्याने माया जमविल्याचे बोलले जाते. त्यामुळे या अशासकीय चालकाचीदेखील एसीबीने चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तक्रारदारांनी 8888800809 किंवा 1064 क्रमांकावर किंवा नाशिक कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल. : शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -