घरदेश-विदेशमहाराष्ट्रातील कंपन्या बंद पडण्यास केंद्र, राज्य सरकारची धोरणे जबाबदार

महाराष्ट्रातील कंपन्या बंद पडण्यास केंद्र, राज्य सरकारची धोरणे जबाबदार

Subscribe

काँग्रेस सावरकरविरोधी नाही

काँग्रेस सावरकरविरोधी नाही, असे स्पष्ट करतानाच भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटात आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये नैराश्य असून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारची लोकविरोधी धोरणे यास जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

भाजपने आपल्या निवडणूक संकल्पनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार असे वचन दिले आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग म्हणाले की, काँग्रेस सावरकर यांच्या विरोधात नाही; पण भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा याचा निर्णय समिती घेते.

- Advertisement -

सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसला आदर आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्ट तिकिटाचे अनावरण करून त्यांचा सन्मान केला होता, असे मनमोहन यांनी सांगितले. सावरकर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते आणि काँग्रेस हिंदुत्वाच्या विचारधारेचे कधीही समर्थन करणार नाही, असे मनमोहन सिंग म्हणाले.

मंदीचे सावट
ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यावर मंदीचे सावट आहे. महाराष्ट्रातील कारखाने बंद पडले आहेत. देशातील व महाराष्ट्रातील आर्थिक संकटावर उपाय शोधण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. प्रत्येक समस्येसाठी विरोधकांना दोष देणे एवढाच उद्योग सरकार करत आहे.२०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी आर्थिक वृद्धीचा दर १०-१२ टक्के असायला पाहिजे,’असे मनमोहन सिंग म्हणाले.

- Advertisement -

तेव्हा संघ, भाजप कुठे होते?

देशात काँग्रेसच्या देशभक्तीला तोड नाही. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला कुठल्या आणि कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव कुठेही नव्हते, असे मनमोहन सिंग यांनी ठणकावून सांगितले.

देशाचे भविष्य अंधारात
काँग्रेसच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना नेहमीच मदत करण्यात आली. शेतकर्‍यांची कर्जे माफ करून त्यांना दिलासा दिला गेला. मात्र, सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे आणि आर्थिक मंदीमुळे देशाचे भविष्यच अंधारात गेले आहे. दरवाढीवर नियंत्रण राखण्याच्या हट्टाचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. आयात-निर्यात धोरणालाही झळ बसली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच असून महाराष्ट्र याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे, ही दुर्दैवाची बाब आहे,’ असे मनमोहन सिंग म्हणाले.

३७० कलम हटवण्यास विरोध नाही
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही मनमोहन यांनी भाष्य केलं. कलम ३७० हटवण्यास आमचा विरोध नाही, मात्र या निर्णयाची ज्याप्रकारे अंमलबजावणी करण्यात आली आहे, त्यास आमचा आक्षेप आहे, असे मनमोहन म्हणाले.

पीएमसी बँक खातेदारांना दिलासा
पीएमसी बँक खातेधारकांनी मनमोहन सिंग यांची गुरुवारी मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांना दिलासा देताना मनमोहन सिंग यांनी खातेधारकांना संयम पाळण्याची विनंती केली. संसदेच्या आगामी अधिवेशनात पीएमसीचा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असेही सिंग म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -