घरमहाराष्ट्रठरले! युतीच सत्तेवर?

ठरले! युतीच सत्तेवर?

Subscribe

मुख्यमंत्री, गृहमंत्रीपद भाजपकडे

शिवसेना आणि भाजपला उपमुख्यमंत्रीपद
८ कॅबिनेट, ८ राज्यमंत्री आणि महामंडळे
यूपीएच्या धर्तीवर युतीसाठी समिती
समितीचे अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे!

मुख्यमंत्री पदावरून आक्रमक असलेल्या शिवसेनेमुळे भाजप पुरते झुकले आहे. शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी सोडून भाजपने जवळपास शिवसेनेच्या बर्‍याच मागण्या मान्य केल्याचे भाजपच्या सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला बोलताना सांगितले. भाजप, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह 16 मंत्रीपदे देण्यास राजी झाला आहे.

- Advertisement -

त्यापैकी 8 कॅबिनेट तर 8 राज्यमंत्रीपदे आणि काही महामंडळांचाही समावेश असेल. याशिवाय केंद्रातील युपीए सरकारच्या धर्तीवर राज्यात युतीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे अध्यक्षपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचे निश्चित झाल्याचे सुत्रांनी सांगितले. हे सर्व भाजपच्या गोटातून सांगण्यात आले आहे. मात्र शिवसेनेने त्याला दुजोरा दिलेला नाही.

शिवसेनेला जास्त मंत्रीपदेच नाहीतर सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महामंडळामध्ये देखील शिवसेनेला वाटा देण्यात येणार आहे. सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे ठेवून शिवसेनेला हवी असलेली खाती देण्यात यावीत, असे केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते.

- Advertisement -

तर रेसकोर्सला होणार शपथविधी –
दरम्यान वर्षावर भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेसमोर प्रस्ताव ठेवतील. हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य झाल्यास येत्या दोन दिवसांत शिवसेना-भाजप महायुतीचा शपथविधी सोहळा रेसकोर्स येथे पार पडेल अशी माहिती देखील मिळत आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता शिवसेना-भाजपमधील तू तू मै मै अंतिम टप्प्यात असून, सर्व वाद मिटून शिवसेना-भाजपचे नेते रेसकोर्सवर शपथ घेतील. असे ठामपणे सांगितले आहे.

म्हणून मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहणार
शिवसेनेने ‘जे ठरलंय तेच झालं पाहिजे’ अशी भूमिका घेत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घ्यावे अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे ठेवून बाकी सत्तेत शिवसेनेला समसमान वाटा देण्यात येणार आहे. सोमवारी रात्री वर्षावर उशिरापर्यत याबाबत बैठक सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रासारखे राज्य हातचे घालवायचे नाही, त्यामुळे शिवसेनेच्या दबावापुढे भाजपला झुकावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -