घरफिचर्सगद्य पद्यमिश्रित नाटकाने रंगभूमीची सुरुवात

गद्य पद्यमिश्रित नाटकाने रंगभूमीची सुरुवात

Subscribe

५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर नाटककार विष्णूदास अमृत भावे स्वरचित ‘सीता स्वयंवर’ ह्या मराठीतील पहिल्या गद्य पद्यमिश्रित नाटकाचा प्रयोग करत मराठी नाट्य रंगभूमीचा पाया रचला.

१६वे शतक इंग्रजी रंगभूमीसाठी सुवर्णकाळ ठरला. शेक्सपिअर, व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर ड्युमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने यांची फ्रेंच नाटके, ब्रेख्त आणि गटे यांची जर्मन नाटके तर अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके तसेच आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमी गाजवली. अशाप्रकारे १६व्या शतकात विदेशी नाटकांनी क्रांती करत जगात वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्रालासुद्धा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नाटककारांची परंपरा आहे. भारतीय रंगभूमीवर मराठी रंगभूमीचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. मराठी रंगभूमीला १५० वर्षांचा कौतुकास्पद इतिहास आहे. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर नाटककार विष्णूदास अमृत भावे स्वरचित ‘सीता स्वयंवर’ ह्या मराठीतील पहिल्या गद्य पद्यमिश्रित नाटकाचा प्रयोग करत मराठी नाट्य रंगभूमीचा पाया रचला. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून राज्यातील नाटक क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. वि. दा. सावरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीची स्थापना करण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणार्‍या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून ५ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन म्हणून जाहीर करण्यात आला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मराठी रंगभूमी अधिक बहरल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्रात नवनिर्मितीचे, आंदोलनाचे वारे वाहत होते. त्याचवेळी विद्याधर गोखले-भालचंद्र पेंढारकर यांच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना स्तिमित केले होते. याच काळात रंगभूमीवर आलेली पुरुषोत्तम दारव्हेकरांचे ‘कट्यार काळजात घुसली’, वसंत कानेटकरांची ‘मत्स्यगंधा’, ‘मीरामधुरा’ आणि ‘लेकुरे उदंड झाली’, विद्याधर गोखलेंची ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’ आणि बाळ कोल्हटकरांचे ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके प्रचंड गाजली. याच दशकात वि. वा. शिरवाडकर, पु.ल. देशपांडे, बाळ कोल्हटकर, मधुसूदन कालेलकर, वसंत सबनीस या नाटककारांनी त्यावेळी सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतून आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतून पुढे आलेल्या नाटककार, नट, दिग्दर्शकांना घडवले. यामध्ये वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, विजया मेहता, पुरुषोत्तम दारव्हेकर, रत्नाकर मतकरी, शं.गो. साठे, चिं.त्र्यं. खानोलकर, डॉ. श्रीराम लागू, माधव वाटवे, मधुकर तोरडमल, दत्ता भट, सई परांजपे, शं.ना. नवरे, काशिनाथ घाणेकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे आदींची नावे आघाडीवर आहेत. सत्तरचं दशक मराठी रंगभूमीचे सुवर्णयुग मानले जाते. या दशकात त्या काळी देशात चाललेली जन आंदोलने तसेच सत्ताधार्‍यांबद्दल पसरत चाललेली निराशा नाटकांद्वारे सादर होत होती, पण त्यानंतरचे ८० वे दशक मराठी रंगभूमीसाठी मंदीचा काळ ठरला. देशातील राजकीय अस्थिरता, आणीबाणी यामुळे सामान्य प्रेक्षकाने रंगभूमीकडे पाठ फिरवली. या काळात ‘मोरुची मावशी’, महेश एलकुंचवारांचं ‘वाडा चिरेबंदी’ आणि श्याम मनोहरांची ‘यकृत’ आणि ‘हृदय’ ही नाटके उल्लेखनीय ठरली. नव्वदच्या दशकातील घटकांनी देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रावर खोल परिणाम केला. लोक दहशतीच्या सावटाखाली वावरू लागले होते. त्यामुळे मराठी नाटकांच्या रात्रीच्या प्रयोगांना प्रेक्षक मिळेनासे झाले. परिणामी नाटकांचे रात्रीचे प्रयोग बंद पडले. या वेळी प्रेक्षकांना नाटकगृहापर्यंत खेचून आणण्याची किमया तरुण नाटककार आणि दिग्दर्शकांनी केली. ‘किरवंत’, ‘कोण म्हणतं टक्का दिला’, ‘चारचौघी’, ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा!’, ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘ध्यानिमनी’, ‘शोभायात्रा’, ‘रणांगण’ यांसारख्या नाटकांमधून वेगळे विषय मराठी रंगभूमीवर सादर करण्यात आले, पण तरीही सत्तरच्या दशकातील नाटकांना प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळाला तो या दशकात मिळाला नाही. अशा परिस्थितीतही ‘ऑल दि बेस्ट’ आणि ‘दशकाच्या शेवटी,’ ‘यदाकदाचित’ या नाटकांनी त्यापूर्वी रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकांच्या लोकप्रियतेचे विक्रम मोडीत काढले. दोन्ही नाटके सुपर-डुपर हिट झाली. विसावे, एकविसावे शतक मराठी रंगभूमीसाठी आव्हानात्मक ठरले. या काळात झपाट्याने झालेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीने रंगभूमीला मागे पाडले. टीव्ही, वृत्तपत्रांचे बदललेले स्वरूप, संगणक आणि इंटरनेटचे जाळे, चित्रपटांनी तंत्रज्ञानात घेतलेली झेप यांच्याशी सामना करण्यात मराठी रंगभूमी कमी पडू लागली. कलाकार, लेखकांनीसुद्धा टीव्ही, चित्रपटाचा मार्ग धरला. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा रंगभूमीकडे वळते करणे हे नवीन लेखक, नाटककारांना आव्हान ठरत आहे. त्यातही परेश मोकाशी आणि गिरीश जोशी या नाटककारांनी विनोदी नाटके रंगभूमीवर आणून प्रेक्षकांना मराठी नाटकांची दखल घ्यायला भाग पाडलेर, पण तरीही आज बदलतं तंत्रज्ञान, नाटकं रंगभूमीवर चालतील अशी गणितं या सर्वांचा व्यावसायिकांना विचार करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -