घरदेश-विदेशउधाण गाठीभेटींना

उधाण गाठीभेटींना

Subscribe

सत्तास्पर्धा दिवस १२ वा कोंडी कायम

 विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस उलटले तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. मात्र राज्यातील राजकीय घडमोडींना उधाण आले असून सोमवारचा दिवस सर्वच पक्षांसाठी राजकीय गाठीभेटींचा ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले. दुसरीकडे मुंबईत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. सोमवारी झालेल्या या भेटीगाठींपैकी काही सदिच्छा तर काही प्रशासकीय कामांसाठी असल्याचे सांगितले जात असले तरी त्यामागील सुप्त हेतू राज्यातील सत्ताकारणाचा आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून ९ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थानापन्न होण्यासाठी अजून ५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

आम्ही हस्तक्षेप करणार नाही; तुम्हीच चर्चा करा

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने राज्यातील सत्ता स्थापनेबाबत इतक्यात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. शिवसेनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चर्चा करावी. राज्याच्या नेतृत्त्वाने चर्चा केल्यानंतर केंद्रीय नेतृत्त्व त्यावर शिक्कामोर्तब करील, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले असल्याचे सुत्रांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवस झाले तरी भाजपने राज्यात सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनाच कोंडी फोडण्यासाठी मातोश्रीवारी करावी लागणार असल्याचे समजते.

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवस उलटले आहेत. अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून राहिली असताना भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. या तिढ्यामुळे शिवसेना-भाजपत सरकार स्थापनेबाबत चर्चाही खुंटलेली आहे. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यातील अवकाळी पाऊसग्रस्त शेतकर्‍यांना केंद्र सरकारची मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे सोमवारी दिल्लीत गेले होते. दिल्लीत असताना सरकार स्थापनेबाबतचा हा ‘डेडलॉक’ तोडण्याच्या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र आपण सत्ता स्थापनेबाबत इतक्यात हस्तक्षेप करणार नाही. आपणच शिवसेनेशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा. त्यावर आपण शिक्कामोर्तब करू, असे निर्देश शहा यांनी फडणवीस यांना दिल्याचे सुत्रांकडून समजते.

- Advertisement -

अमित शहा यांच्या या निर्देशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी रात्री मुंबईत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. मंगळवारपासून मुख्यमंत्री स्वत: सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे कळते.

शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्तावच नाही

राज्यात सरकार स्थापनेबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याने आम्ही पुढे कसे जाणार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापनेबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सस्पेन्स वाढवणारे विधान करत पुन्हा सोनियांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुढे काय करायचे, याबाबत रणनीती ठरवली होती. त्यानंतर आज मी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी हेसुद्धा उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे. सरकार स्थापन करण्याइतपत संख्याबळ आमच्याकडे नाही. राज्यात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार बनवण्याची जबाबदारी भाजपाची आहे, असे पवार म्हणाले.

सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा आणणार नाही

महाराष्ट्रातील राजकीय गतिरोध शिगेला पोहोचला असतानाच सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यात कोणाचेही असले तरी लवकरात लवकर सरकार येवो, शिवसेना त्यात अडथळा निर्माण करणार नाही, असे आपण राज्यपालांना सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की मी आणि रामदासभाई कदम काही वेळापूर्वी राज्यपालांना भेटलो. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाली.

मात्र आम्ही राजभवनातील शिष्टाचाराच्या मर्यादेत राहून चर्चा केली, असे संजय राऊत म्हणाले.ही एक सदिच्छा भेट होती.गेल्या काही काळापासून राज्यपालांची भेट घेण्याची इच्छा होती, पण वेळेचे गणित जुळत नव्हते. अखेर आज भेटीचे गणित जुळून आले. या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

राज्यात कोणाचेही सरकार आले तरीही ते लवकरात लवकर येवो, सरकार स्थापनेत शिवसेना खोडा घालणार नाही, असे आश्वासन आपण राज्यपालांना दिले. ही सदिच्छा भेट असल्याने आम्ही राज्यपालांना उद्धव ठाकरेंनी भेट म्हणून पाठवलेली काही पुस्तके भेट म्हणून दिली. यात बाळासाहेबांच्या फटकारे या व्यंगचित्र संग्रहाचाही समावेश होता,असेही राऊत यांनी सांगितले. तसेच बर्‍याच वर्षानंतर राज्याला अनुभवी, राजकारणाची जाण असलेला राज्यपाल लाभला असल्याचे सांगत राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -