घरमहाराष्ट्रअजित पवार यांच्या प्रकृतीची चिंता वाटते, ठाकरे गटाची कोपरखळी

अजित पवार यांच्या प्रकृतीची चिंता वाटते, ठाकरे गटाची कोपरखळी

Subscribe

मुंबई : पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. उपमुख्यमंत्री अजित पावर हे तर इतक्या ओशाळवाण्या पद्धतीने बोलत आहेत की, त्यांना पाठकणा आहे की नाही? असा प्रश्न पडू लागला आहे. ‘‘महाराष्ट्राचे एकमेव हितकर्ते अमित शहाच,’’ अशी भाषणे अजित पवार करू लागले आहेत. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे, अशी कोपरखळी ठाकरे गटाने लगावली आहे.

केंद्रीय मंत्री शहा यांना महाराष्ट्राचा पाया खतम करायचा आहे. मऱ्हाटी राज्याला गुलाम करायचे आहे. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेली शिवसेना तोडली व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओवाळून टाकलेल्या भ्रष्ट लोकांची ‘मोट’ बांधली व राज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली. सत्तेवर सर्व मिंधे, पण बादशाही गुजरातकडे असे जे चित्र दिसत आहे ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविणारे आहे, असे सामना दैनिकातील अग्रलेखात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राला काय मिळाले?
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शहा हे महाराष्ट्राचे जावई आहेत. मग हुंडा म्हणून ते महाराष्ट्रातील उद्योग, गुंतवणूक, मुंबईतील धनसंपत्ती गुजरातेत घेऊन चालले आहेत काय? याचे उत्तर द्या. अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली? मुंबईत जन्मले, महाराष्ट्राचे जावई झाले, येथे कारखाना चालवला, यात महाराष्ट्राला काय मिळाले? निदान सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर तरी गृहमंत्री शहांना भूमिका घ्यायला लावा. तर त्या जावयांची ओवाळणी करू, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

महाराष्ट्र कायद्याचे राज्य
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, शहा हे कष्टाळू आहेत. मात्र मुंबईसह महाराष्ट्र हा मऱ्हाटी माणसांच्या कष्टातून, रक्तातून निर्माण झाला याचा विसर शिंदे यांना पडलेला दिसतो. महाराष्ट्रात दंगली पेटाव्यात व त्यातून भाजपाला राजकीय लाभ मिळावा, असे एक कारस्थान रचले जात आहे. सर्वज्ञानी गृहमंत्र्यांपर्यंत ही खबर गेली असेलच. महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. डॉ. आंबेडकर याच मातीतले. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी येथे कायद्याचेच राज्य शेवटपर्यंत राहील, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

व्यापारी राज्य लवकरच उलथणार
पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले-गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल. फडणवीस म्हणतात की, अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो. बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत. हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल. देशात तसेच वारे वाहत आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -