घरमहाराष्ट्रनाना पटोलेंच्या अडचणीत वाढ!

नाना पटोलेंच्या अडचणीत वाढ!

Subscribe

नाशिक, भंडारा, नागपूरमध्ये भाजपकडून तक्रार दाखल, अटकेच्या मागणीसाठी राज्यपालांना निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी जोरदार समाचार घेतला आहे. याच प्रकरणात भाजप नेत्यांकडून नाशिक, भंडारा आणि नागपूरमध्येही तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची मंगळवारी राजभवन येथे जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, दक्षिण मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, उत्तर पूर्व मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष अशोक राव, मुंबई भाजप प्रवक्ते निरंजन शेट्टी उपस्थित होते.

- Advertisement -

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील कोराडी पोलीस स्टेशन येथे नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. यावेळी नाना पटोले यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते हटायला तयार नसल्यामुळे पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना ताब्यात घेतले.

तर, मुंबईतील कांदिवलीमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना अटक करण्यात यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्ते यांनी केली. यावेळी पोलिसांनी भातखळकर यांनाही ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

- Advertisement -

चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी येथे केली.

आपण पंतप्रधानांबद्दल बोललोच नव्हतो, असा खुलासा पटोले यांनी केला असून हा खुलासा हास्यास्पद आहे. चोर तो चोर वर शिरजोर असाच हा प्रकार आहे. नारायण राणे यांना अटक करताना जो न्याय लावला तोच न्याय पटोले यांनाही लावावा, असेही उपाध्ये म्हणाले.

पोलिसांनी दावा फेटाळला
नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींनी पकडल्याचा दावा केला होता. परंतु भंडारा पोलिसांनी अशा नावाच्या कुठल्याही व्यक्तीला अटक केलेली नाही, असे सांगत पटोलेंचा दावा फेटाळून लावला. भंडारा पोलिसांनी याप्रकरणी 12 जणांचा जबाब नोंदवला असून भंडारा पोलीस अधिक्षकांकडून गृहविभागाने अहवाल मागितला आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -