घरमहाराष्ट्रनाशिकExclusive : अन् कचर्‍याच्या साम्राज्यात खेळविल्या स्पर्धा; 'झेडपी' कडून खेळाडूंची कुचेष्टा

Exclusive : अन् कचर्‍याच्या साम्राज्यात खेळविल्या स्पर्धा; ‘झेडपी’ कडून खेळाडूंची कुचेष्टा

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातर्फे घेण्यात येणार्‍या अध्यक्षीय चषक स्पर्धांमधून प्राथमिक विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या स्पर्धांचाच एक भाग म्हणून काही स्पर्धा या शासकीय कन्या विद्यालयातील मुख्य इमारतीच्या मागील इमारतीत धुळ अन कचर्‍याच्या साम्राज्यात घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शासकीय कन्या विद्यालयाची ही इमारत अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचेच दिसून येते. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा, धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी इमारतीच्या वर्‍हाड्यांत, जमिनीवर बसविण्यात आले. वीजेची व्यवस्था नसलेल्या 10 बाय 20 च्या बंद खोलीत वक्तृत्व, बुध्दीबळ स्पर्धा अन इमारतीच्या वर्‍हाड्यांत तसेच जमिनीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्याने तालुकास्तरावरील अनेक शिक्षकांनी नियोजनावर नाराजी व्यक्त केली. वास्तविक तालुकास्तरावर घेण्यात येणार्‍या स्पर्धांचे नियोजन अतिशय चोखपणे पार पाडण्यात येते.

- Advertisement -

लाईट, पाणी, वीजेची व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाशयोजना यांची व्यवस्था तालुकास्तरावरील स्पर्धांदरम्यान केलेली असते. मात्र या सुविधांशिवाय स्पर्धा घेण्याची करामत प्राथमिक विभागाने करुन दाखविली. तालुकास्तरावर विद्यार्थी स्पर्धेसाठी चांगली तयारी करुन येतात. मात्र जिल्हास्तरावरील स्पर्धेदरम्यान त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.. खेळाडू हे देशाचे भवितव्य असतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करुन देणे हा नियोजनाचा भाग असतो. मात्र जिल्हा परिषदेला याचा विसर पडल्याची खंत अनेक पालकांनी यावेळी बोलून दाखविली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये अध्यक्षीय चषक स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या जेवणाच्या, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेदरम्यान अस्वच्छता अन अनागोंदी समोर आली होती. यानंतर शासकीय इमारतीतील धुळ अन कचर्‍याने वेढलेल्या इमारतीत स्पर्धा घेण्यात आल्याने अनेकांनी नापसंती व्यक्त केली.

अध्यक्ष चषक तीन दिवसीय असायला हवा

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा या दोन दिवसांऐवजी तीन दिवसीय असायला हव्यात अशी मागणी यावेळी उपस्थित पालकांनी केली. एक दिवस लहान गट स्पर्धा, एक दिवस मोठा गट स्पर्धा आणि एक दिवस क्रीडा स्पर्धा असे नियोजन असल्यास विद्यार्थ्यांना, शिक्षकांना स्पर्धेेसाठी योग्य पध्दतीने तयारी करणे सोपे जाईल तसेच पालकांनाही नियोजन करता येईल अशी माहिती पालकांनी दिली.

- Advertisement -
वेळेचा ताळमेळ नाही

स्पर्धेसाठी तालुक्यातून विद्यार्थ्यांना सकाळी 9 वाजता मैदानावर बोलविण्यात आले; मात्र स्पर्धा दुपारी 12.30 ला सुरु झाल्या. नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना मैदानावर उन्हामध्ये सुमारे तीन तास ताटकळत बसावे लागले. विद्यार्थी अक्षरश: कंटाळल्याचे दिसून आले. वास्तविक विद्यार्थ्यांना सकाळी 9 वाजता मैदानावर बोलविल्यानंतर स्पर्धा त्वरीत सुरु होणे अपेक्षित होते.

उद्देशाचा विसर

जिल्हा परिषदे शाळेत शिकणार्‍या गरीब, मोलमजुरी करणार्‍यांच्या पाल्यांनी खेळांत प्राविण्य मिळवावे, देशाचे भवितव्य उज्वल करावे या उद्देशाने सन 1998 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल आहेर (नांदगाव) यांनी जिल्हा परिषद अध्यक्षीय चषक स्पर्धा सुरु केल्या. या स्पर्धांद्वारे गरीब विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा त्यामागचा उद्देश होता. यासाठी योग्य आणि कठोर नियोजन करण्याचा पायंडा त्यांनी पाडला होता. मात्र यंदाच्या स्पर्धांचे नियोजन बघता जिल्हा परिषदेला या उद्देशाचा विसर पडल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -