घरमहाराष्ट्रलॉकडाऊन काळात तळीरामांची फसवणूक

लॉकडाऊन काळात तळीरामांची फसवणूक

Subscribe

विदेशी बाटलीत बनावट दारू,

लॉकडाऊनच्या काळात ज्या प्रकारे गावठी दारूची मागणी वाढली, त्याच प्रकारे दमण येथून येणार्‍या बनावट दारूच्या पुरवठ्यात मोठी वाढ झाली आहे. ही दारू बनावट असली तरी ती हुबेहूब विदेशी दारू प्रमाणे आहे. त्यामुळे यातील फरक कळून येत नाही. ही बनावट दारू विदेशी दारूच्या बॉटलमध्ये भरून विक्री करण्याचा काळाधंदा लॉकडाऊनमध्ये प्रचंड वाढला आहे. विदेशी समजून बनावट दारू पिणार्‍या तळीरामांची दारू विक्रेत्याकडून घोर फसवणूक केली जात आहे.

लॉकडाऊनमध्ये तळीरामांसाठी ‘दारू’ जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. दारू मिळवण्यासाठी तळीरामांची जी धडपड सुरू आहे, ती बघून हसावं की रडावं हा प्रश्न अनेकांना पडत आहे. बीअर बार, वाईन्स शॉपमध्ये असलेला दारूचा साठा केव्हाच संपला आहे, अधिकृत दारूचा पुरवठा देखील पूर्णपणे बंद आहे. परंतु दमण येथून चोरट्या मार्गाने बनावट दारूचा पुरवठा मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्याचा महसूल बुडवून बनावट दारूचा पुरवठा करणारी मोठी साखळी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये तयार झाली आहे.

- Advertisement -

डहाणूपासून १८ कि.मी. अंतरावर गुजरात राज्याची हद्द सुरू होत असल्याने दमण येथील अवैध दारू मोठ्या प्रमाणात बोर्डी-डहाणू, उधवा-तलासरी मार्गाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून राज्यात आणली जात आहे. दारूच्या या चोरट्या वाहतुकीमुळे राज्य शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

महत्त्वाचे म्हणजे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून देखाव्यासाठी महिन्यातून एक दोन वेळा दारूच्या चोरट्या वाहतुकीवर कारवाई करण्यात येते. मात्र नियमित कारवाई होऊ नये यासाठी पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागांना दारूची चोरटी वाहतूक करणार्‍यांकडून मोठी रक्कम पोहचवली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दारू पुरवठा टोळ्यांकडून राज्यात बनावट दारूचा पुरवठा करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवण्यात येते, या टोळ्या रिकाम्या गॅस सिलिंडरचा तळ कापून त्यात दमण येथून आणलेली बनावट दारू भरतात. तर काही वाहनांमध्ये बदल करून दारूसाठी चोर कप्पा तयार करून त्यातून दारूचा पुरवठा करण्यात येतो. हा सर्व प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तसेच मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक वेळा उघडकीस आणलेला आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात विक्री होते. शासनाचा महसूल बुडवून दमण बनावटीची दारू खरेदी करून अवैधरित्या महाराष्ट्रात पुरवठा करणार्‍या विरोधात कारवाई करण्यासाठी डहाणू येथे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लहानसे कार्यालय आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून दारूची चोरटी वाहतूक करण्यात येते, यासाठी दारूची चोरटी वाहतूक करणार्‍या टोळ्यांकडून दमणमधून बनावट दारू आणण्यासाठी वेगवेगळ्या कसरती व करामती करून राज्यात बनावट दारू आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

शासनाचा महसूल बुडवून राज्यात अवैधरित्या आणली जाणारी दमणची बनावट दारू विदेशी दारूच्या बॉटलमध्ये भरून राज्यातील महत्त्वाच्या शहरातील बीअर बार, वाईन्स शॉपमध्ये विक्रीसाठी पाठवली जाते. लॉकडाऊनच्या काळात बीअर बार मालक, वाईन्स शॉप मालकांकडून या दारूला मोठी मागणी आलेली असून त्याचा पुरवठा राज्यात वाढवण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमध्ये चोरून दारू विक्री करणार्‍यांकडून विदेशी दारूच्या नावाखाली बनावट दारू देण्यात येत आहे. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तसेच इतर शहरांमधील तळीरामांची दारूच्या बाबतीत मोठी फसवणूक सुरू असून ही दारू पिणार्‍यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दमण तसेच राज्याबाहेरून येणारी दारुची वाहतूक रोखण्यासाठी सर्व चेकनाके तसेच महत्त्वाच्या ठिकाणी भरारी पथके लक्ष ठेवून आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात उत्पादन शुल्क आणि पोलिसांची कारवाई सुरू असून चोरट्या मार्गाने दारू विक्री करणारे बार मालक, तसेच वाईन्स शॉपवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले असल्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -