घरताज्या घडामोडीशिवजयंती साजरी करण्यावरुन शिवसेनेची गोची

शिवजयंती साजरी करण्यावरुन शिवसेनेची गोची

Subscribe

शिवसेना तिथीनुसारच जयंती साजरी करणार आहे, मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र तारखेनुसार जयंती साजरी करतील.

महाराष्ट्रात दोन दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. दोन शिवजयंती ऐवजी एकच जयंती साजरी व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शिवसेना आतापर्यंत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे सरकारने मान्य केलेल्या तारखेनुसार जयंती साजरी करत होती. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते शासकीय तारखेनुसार की तिथीनुसार जयंती साजरी करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर गोंधळात आणखी भर पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असे आवाहन ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद समोर आला होता. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेली शिवसेना काय निर्णय घेते याची चर्चा रंगलेली असताना आता परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकिय शिवजयंती साजरी करणार तर शिवसेना तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करणार, असे आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisement -

दरम्यान अनिल परब माध्यमांना म्हणाले की, जी शासकीय जयंती १९ फेब्रुवारीला होते ती तेव्हाच होईल आणि शिवसेना तिथी नुसार शिवजयंती साजरी करेल. यावेळी वेळ कमी आहे त्यामुळे यावर जो वाद सुरु आहे, त्याबाबत आम्ही सर्व एकत्र बसू आणि समिती गठीत करून ती शिवजयंती एकाच दिवशी साजरी करण्याचा निर्णय करू, असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

 

दोन शिवजयंती हा महाराजांचा अपमान

दरम्यान शिवाजी महाराज यांची दोनदा शिवजयंती साजरी करणे हा शिवाजी महाराजांचा अपमान असल्याची टीका छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. तसेच शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी असे जो तारखांचा वाद सुरू आहे त्यावरून महाराजांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसेच प्रत्येक राजकीय पक्ष किंवा जाती धर्माचे लोक महाराजांना मानतात त्यामुळे सरकारने कुठली तर एक तारीख ठरवावी. जर एकच तारीख असेल तर त्या सोहळ्याला भव्य स्वरूप येईल असे देखील ते यावेळी म्हणालेत.

 

तर भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे असे सांगत एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाका असे म्हटले असून, एक शिवप्रेमी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ असे नितेश राणे हे देखील म्हणालेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -