घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंचा अपेक्षित यु टर्न! म्हणतात, अजितदादा आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट नाही

सुप्रिया सुळेंचा अपेक्षित यु टर्न! म्हणतात, अजितदादा आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट नाही

Subscribe

आमच्या कुटुंबातील नाती वेगळी आहेत आणि राजकीय मते वेगळी आहे. त्याच पद्धतीने अजितदादा आणि शरद पवार यांच्यामधील नात्यांमधील ओलावा कुठेही कमी झालेला नाही, मात्र पक्षातील वैचारिक मतभेदांवर आम्ही नेहमीच एकमेकांच्या विरोधात असणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे गेल्याच आठवड्यात म्हणाल्या होत्या. निमित्त होते, ते प्रसिद्ध उद्योजक अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील निवासस्थानी झालेल्या शरद पवार-अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीचे.

अजितदादांसोबतचे वैचारिक मतभेद कायम राहतील, असे ठामपणे म्हणणार्‍या सुप्रिया सुळेंनी अचानक यूटर्न घेत आता अजितदादा आमचेच नेते असून राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असे मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या दुटप्पी भूमिकेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंच्या तळ्यात मळ्यातच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते गोंधळात पडणार नसतील, तरच नवल.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आम्ही त्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्या तक्रारीवर प्रक्रिया सुरू आहे. आमचा पक्ष अजून एकच आहे. एक गट सतेत्त आहे, तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो, असे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे.

किती हा विरोधाभास?
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्याचे सत्र आजही सुरूच आहे. दोन्ही गटाचे राष्ट्रीय अध्यक्षही दोन आणि प्रदेशाध्यक्षही दोन, तरी आम्ही एकच पक्ष आहोत हे सांगायचे? काका-पुतण्याने एकमेकांसोबत एक दोनदा नव्हे, तर चार चारदा बैठका घ्यायच्या. या भेटी राजकीय नाहीत, असे सांगायचे. अजितदादा गटाने शरद पवार हेच आमचे नेते असल्याचे म्हणायचे आणि कुठल्याही परिस्थितीत मी भाजपसोबत जाणार नाही, असा खुलासा शरद पवारांनी माध्यमांपुढे करायचा. अजितदादा गटाच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा घ्यायच्या.

- Advertisement -

निवडणूक आयोगासहीत विधानसभा अध्यक्षांकडे आम्हीच खरा राष्ट्रवादी पक्ष आहोत, असा दावा दोन्ही गटांनी करायचा आणि अधिवेशनादरम्यान दोन्ही गटांच्या आमदारांनी एकमेकांसोबत हास्यविनोदात रंगायचे. शरद पवार गटाने इंडिया आघाडीत असल्याचे म्हणत संसदेतील अविश्वास प्रस्तावावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकायचा आणि खासदार सुनील तटकरेंनी एकट्याने बाकावर बसून मोदींचे भाषण ऐकत भाजपप्रणित एनडीएशी एकनिष्ठ असल्याचा दिखावा करायचा. आम्ही पुन्हा आम्ही एकच पक्ष आहोत, असे म्हणायचे ही परस्परविरोधी भूमिका राष्ट्रवादीचे प्रामाणिक पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी प्रतारणा नव्हे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी २ जुलै २०२३ रोजी आपल्या ८ सहकार्‍यांसह शिवसेना-भाजप युतीत सामील होत मंत्रीपदाची शपथ घेत आपले काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात उघडपणे बंड पुकारले. तत्पूर्वी ३० जूनला ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवत राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरही दावा केला. ५ जुलै २०२३ ला वांद्य्रातील पक्षाच्या मेळाव्यात अजित पावर यांनी थेट मुद्यालाच हात घातला. मला लोकांसमोर व्हिलन का केले जाते? कुणाकरता चालले आहे हे? वय जास्त झाले, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असे प्रश्न उपस्थित केले. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा घाट घालण्यात आल्याचा दावा करून मनातली खदखदही अजित पवारांनी जनतेपुढे मांडली होती.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार अजितदादा गटातील नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन पक्ष बांधणी करत आहेत. छगन भुजबळांच्या येवल्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये सभा घेत पवारांनी त्यांच्यावर घणाघाती हल्ले करत मतदारांना पर्यायही सुचवले. एकेकाळी शरद पवारांचे ब्ल्यू आईड बॉय असलेल्या दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगावमध्येही आता शरद पवार सभा घेणार आहेत. एकीकडे पवारांच्या सभांचा धडाका सुरू असताना अजितदादा गटातील नेतेही शरद पवारांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका करण्याचे थांबलेले नाही.

कधी कधी पक्षासाठी विरोधात जाऊन निर्णय घ्यावे लागतात, आम्ही आता लहान राहिलेलो नाही, असे खासदार प्रफुल्ल पटेल शरद पवारांना उद्देशून म्हणाले, तर त्याआधी मंत्री दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवारांना कसे एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री होता आले नाही, असे म्हणत जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शरद पवार गटातील आमदार जितेंद्र पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -