घरमहाराष्ट्रहमीभाव घेतल्याशिवाय माघार नाही! शेतकरी नेत्यांचा निर्धार

हमीभाव घेतल्याशिवाय माघार नाही! शेतकरी नेत्यांचा निर्धार

Subscribe

शेतकरी किसान मोर्चाची मुंबईत महापंचायत

शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालाला हमीभाव (एमएसपी) घेतल्याशिवाय शेतकरी माघार घेणार नाही, असा निर्धार रविवारी शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरीविरोधी कायदे संसदेत मागे घेतल्यावरच दिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे घेऊ, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावेळी जाहीर केले. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीने रविवारी आझाद मैदानात किसान -मजदूर -महापंचायत पार पडली. या महापंचायतीत हमीभावासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महापंचायतीस जवळपास १० हजार शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले की, शेतकर्‍यांनी वर्षभर संघर्ष करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या लढ्यातून शेतकर्‍यांनी आत्मसन्मान मिळवला. एमएसपीची मागणी जुनीच आहे, जी २०११ मध्ये पंतप्रधानांनी स्वत: मुख्यमंत्री असताना केली होती. शेतकर्‍यांना एमएसपी मिळेपर्यंत आमचा संघर्ष जारीच राहील, असे यादव यांनी स्पष्ट केले.
यावेळी भारतीय किसान युनियनेचे नेते राकेश टिकैत यांनी आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०११ मध्ये हमीभावाची मागणी केली होती, याकडे लक्ष वेधले. हमीभाव कायदा सरकारने देशात लागू करावा. तसेच सरकारने शेतकर्‍यांसोबत संवाद साधावा, अशी भूमिका टिकैत यांनी मांडली. दिल्लीचा राजा महालाचे दरवाजे बंद करून बसला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनात ७०० जण शहीद झाले. मोदींनी घोषणा करताना देशाची माफी मागितली आहे. मात्र, हमीभाव घेतल्याशिवाय शेतकरी आता शांत बसणार नाही. येत्या ७ डिसेंबरला संसदेत काय होते हे पाहून पुढचा निर्णय घेऊ, असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी यावेळी सांगितले. तसेच मोदींची वापसी सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला.
या महापंचायतीस युद्धवीर सिंग, हन्नन मोल्ला, तेजंदर सिंग, जसबीर कौरनाट, आशिष मित्तल, शेकपाचे भाई जयंत पाटील, कॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत आदी उपस्थित होते.

२१ नोव्हेंबरला शेतकरी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सहा मागण्यांबाबत पत्र लिहिले आहे. त्या पत्रावरील सरकारच्या उत्तराचे विश्लेषण करून मोर्चाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी ४ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक बोलावली आहे, अशी माहिती मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी दिली.

- Advertisement -

अस्थींचे विसर्जन

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शहीद झालेल्या शेतकर्‍यांची अस्थीकलश यात्रा राज्यात ३० जिल्ह्यांतील भ्रमणानंतर रविवारी हुतात्मा चौकात पोचली. १०६ हुत्मात्यांना अभिवादन करून यात्रेचा आज समारोप करण्यात आला. महापंचायत झाल्यानंतर शहीद शेतकर्‍यांच्या अस्थीचे गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात विसर्जन करण्यात आले.

महापंचायतीत करण्यात आलेल्या मागण्या

१)दिल्लीतील आंदोलनात बळी गेलेल्या ७०० शेतकर्‍यांच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी.
२) सीड बील लागू करू नये
३)शेतकर्‍यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत आणि आंदोलकांशी चर्चा करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -