घरमहाराष्ट्रकल्याण डोंबिवलीत शिवसेना प्रवेशासाठी नगरसेवकांची रांग?

कल्याण डोंबिवलीत शिवसेना प्रवेशासाठी नगरसेवकांची रांग?

Subscribe

डझनभर नगरसेवक पक्षांतर करण्याच्या तयारीत

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक यावेळी प्रथमच पॅनेल पद्धतीने होणार असल्याने त्याचा विरोधी पक्षातील नगरसेवकांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसते. पॅनेल पद्धतीचे वार्ड असुरक्षित वाटत असल्याने शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे सर्वच राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांची रांग लागली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तब्बल दीड डझन माजी नगरसेवक इच्छुक असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक नवीन वर्ष २०२२ मध्ये फेब्रुवारी – मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे पाहिले तरी अजून तीन – चार महिन्यांचा अवधी आहे. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पॅनेल पद्धतीच्या वार्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार झाला आहे. कदाचित डिसेंबर मध्ये वार्ड रचना जाहीर करून ती अंतिम केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी मध्ये वार्ड आरक्षण निश्चित करण्याची व मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया एकाच वेळी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका होतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

डोंबिवली पूर्वेतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पूर्वी एक वार्ड, एक नगरसेवक अशी एकल पद्धत होती. त्यामुळे एखाद्या नगरसेवकाचे आपल्या भागावर चांगले प्रभुत्व असायचे. मात्र, आता तीन वार्ड मिळून एक पॅनेल अस्तित्वात येणार आहे. आपल्या आजूबाजूला दुसर्‍या पक्षाचे नगरसेवक असतील तर निवडून येण्याची पंचाईत होणार असल्याने अनेक नगरसेवकांनी या पॅनेल पद्धतीचा चांगलाच धसका घेतला आहे.
एकल पद्धतीच्या वार्डमधून निवडून येणे सहज सोपे असायचे. मात्र, पॅनेल पद्धतीच्या वार्डमधून निवडून येणे अवघड होणार आहे. त्यासाठी एक तर पक्षाचे संघटनात्मक जाळे मजबूत हवे. त्यातच उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क व तितकेच प्रभावी कार्य असेल तरच निवडून येता येणार आहे. एकंदरीत पॅनेल पद्धत असुरक्षित वाटू लागल्याने पुन्हा निवडून येण्यासाठी अनेकजण पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळी इतर पक्षातून मोठ्या संख्येने भाजपत गेलेले पुन्हा माघारी फिरण्याच्या मूडमध्ये आहेत. भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे सर्वच राजकीय पक्षांचे तब्बल दीड डझन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. अनेकजण पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ .श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -