घरमहाराष्ट्रशेतकर्‍यांच्या बँक खात्यात १० हजार रुपये

शेतकर्‍यांच्या बँक खात्यात १० हजार रुपये

Subscribe

शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध तीला दिले प्रथम प्राधान्य

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच १० रुपयांत थाली देण्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आल्यानंतर शनिवारी जाहीर केलेल्या वचननाम्यात पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडला आहे.वचननाम्यात प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि युवा वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.राज्यातील अल्पभूधारक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी १० हजार रूपये जमा करण्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्याबरोबरच ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्य म्हणजे, या वचनाम्यात महिलांना प्राधान्य देत आर्थिक दुर्बल घटकांंतील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करण्याचे वचन देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर आणि सूरज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वचननाम्यात शिवसेनेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवा आदी घटकांसह ऊर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांना स्पर्श केला आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करेल, असे उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या वचननाम्यात आरेबाबत घोषणा करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आरेबाबत कोणतीही घोषणा या वचननाम्यात करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रूपये जमा होणार आहेत. भाजपच्या योजनेला शह देण्यासाठी शिवसेनेने शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी १० हजार रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय कर्जबाजारी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे, ठिबक सिंचन योजनेला उत्तेजन म्हणून तीन वर्षासाठी १५ टक्के अनुदान देण्याचे, कृषी उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी खते, बी-बियाणांच्या किंमती पुढील पाच वर्ष स्थिर ठेवण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे. याशिवाय राज्य सरकारच्या सेवेतील सर्व स्तरावरील रिक्त पदे भरण्याचे, स्थानिकांसाठी ८० टक्के आरक्षित नोकर्यांसाठीच्या कायद्याची सक्तीने अंमबजावणी करण्याचे, पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री आवास योजना अंमलात आणून प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर उपलब्ध करून देण्याचे तसेच कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी विमानतळ चोवीस तास कार्यान्वित करण्याचे आश्वासन वचननाम्यात आहे.

वचननाम्यात या घोषणाच नाहीत

- Advertisement -

<१० रुपयांमध्ये जेवणाची थाळी

<आरे जंगल घोषीत करणे

वचननाम्यातील अन्य आश्वासने
निराधार योजनेच्या अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार
राज्यात एक हजार ठिकाणी सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते
पोलीस भरतीत पूर्वीप्रमाणेच आधी मैदानी नंतर लेखी परीक्षा घेणार
प्रत्येक जिल्ह्यात एक महिला बचतगट भवन उभारणार
३५ वर्षांखालील युवकांना घरासाठी सिडको, म्हाडात २ टक्के आरक्षण
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी २५००बसची सेवा सुरू करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -