घरमहाराष्ट्रनरेंद्र मोदी,राहुल गांधी आज महाराष्ट्रात

नरेंद्र मोदी,राहुल गांधी आज महाराष्ट्रात

Subscribe

नरेंद्र मोदींच्या दोन, तर राहुल गांधींच्या तीन सभा,प्रचाराच्या शेवटच्या रविवारी सभांचा झंझावात

निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा रविवार. सुट्टीचा दिवस. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रविरारचा मुहूर्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा राज्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिलीच सभा असल्याने भाजप नेत्यांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

तर राहुल गांधी देखील रविवारी राज्याच्या दौर्‍यावर असून त्यांच्या मुंबईत दोन ठिकाणी सभा होणार असल्याने मुंबई काँग्रेसने यासाठी आपले सर्वस्वपणाला लावले आहे. या दोन बड्या नेत्यांच्या प्रचार झंझावताने रविवार ढवळून निघणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे. प्रचार आता अंतिम टप्प्याच्या दिशेने कूच करत असताना अनेक बड्या नेत्यांनी सध्या महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. रविवारची सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी महायुतीप्रमाणेच महाआघडीच्या नेत्यांमध्ये तारेवरची कसरत सुरु झाली आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीतर्फे स्टार प्रचाराकांच्या सभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. सर्वांचे लक्ष जळगाव येथे होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे लागले आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांची ही पहिलीच सभा असून ती जळगाव येथील कुसुंबा येथे दुपारी १२ वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता भंडारा येथील साकोली येथे मोदींची दुसरी सभा होणार असल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या सभांमधून भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच रविवारी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देखील तीन ठिकाणी सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असल्याने ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच महाआघाडीने संयुक्तरित्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्या अनुषंगाने राहुल गांधी कोणत्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राहुल गांधी यांची रविवारची पहिली सभा लातूर येथील औसा येथे दुपारी २.१५ वाजता होणार आहे. त्यानंतर ते मुंबईत दाखल होणार असून मुंबईत दोन सभा घेणार आहेत. मुंबईत संध्याकाळी ५ वाजता चांदिवली येथे तर दुसरी सभा धारावी येथे संध्याकाळी ६.३० वाजता घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचा रोड शो

शिवसेनेनेही रविवारचा जास्तीतजास्त प्रचारासाठी उपयोग करून घेण्याचे ठरवले आहे. शिवसेनेचे वरळी येथील उमेदवार आदित्य ठाकरे आपल्या मतदार संघात रोड शो काढणार आहेत. लोअर परळ येथील फिनिक्स मॉल येथून या रोड शोला सुरुवात होणार असून पुढे सेनापती बापट मार्ग येथून सीताराम जाधव मार्गावरुन वरळी पोस्ट ऑफीस येथील सिद्धार्थ नगर येथे या रोड शोचा शेवट होणार असल्याचे शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -