घरक्राइमलाचखोर बहिरमच्या घरात सापडले घबाड; रोकड, सोने, चांदी 'असा' मोठा मुद्देमाल जप्त

लाचखोर बहिरमच्या घरात सापडले घबाड; रोकड, सोने, चांदी ‘असा’ मोठा मुद्देमाल जप्त

Subscribe

नाशिक : लाचखोर तहसीलदार नरेशकुमार बहिरम याला रविवारी (दि.६) जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. जे. मोरे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बहिरमचे नवनवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेत साडेचार लाखांची रोकड, ४० तोळे सोने व १५ तोळे चांदी जप्त केली. लाचखोर बहिरमला आठ वर्षांपूर्वी सुरगाण्यातील सार्वजनिक धान्य घोटाळ्यात त्र्यंबकेश्वर येथे तहसीलदार असताना निलंबित करण्यात आले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.६) बहिरमला १५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. राजुर बहुला येथील जमीनमालकाला मुरूम उत्खननाबाबत पाचपट दंड व स्वामित्व धन मिळून एकूण सव्वाकोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. या कारवाईतून दिलासा देण्यासाठी बहिरमने तक्रारदाराकडे लाच मागितली होती. विशेष म्हणजे बहिरम आपल्या राहत्या घराच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ही रक्कम स्विकारत असताना ही कारवाई झाली. त्याचे कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अंतर अवघे १०० मीटर आहे. त्यामुळे तो स्वत:ला जिल्हाधिकारी असल्याचे समजून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वावर करत असल्याचेही समोर आले आहे. त्याच्या भ्रष्ट कार्यपद्धतीची चर्चा महसूल विभागासह नाशिककरांमध्ये सुरू आहे. त्याने प्रत्येक केसेसमध्ये केवळ तारखा दिल्या आहेत. तो नेहमी वकिलांच्या सहमतीने, असे कागदपत्रांवर लिहून तारखा बदलत असल्याचेही समोर आले आहे. त्याने येवला व त्र्यंबकेश्वर येथे तहसीलदार, विभागीय कार्यालयात चिटणीसपदी कामकाज केले आहे.

- Advertisement -

नवनियुक्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नाशिकमध्ये पदभार घेऊन अवघे १५ दिवस झालेले असताना महसूल विभागातील लाचखोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. लाचखोर बहिरम मेन इनवर्ड रजिस्टरवर संदर्भ लिहून कर्मचार्‍यांना द्यायचा. त्याची चौकशी व त्याने कोणती कार्यवाही केली, याची पडताळणी जिल्हाधिकारी शर्मा यांनी केली तर त्याचा भ्रष्टाचार समोर येईल. त्याच्या वैयक्तिक फायलिंगची चौकशी करावी, अशी मागणीही माजी सनदी अधिकारी सुधीर रावळे यांनी रविवारी केलेल्या फेसबूक लाईव्हद्वारे केली आहे.

असा झाला युक्तीवाद

लाचखोर बहिरमला रविवारी (दि.६) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील गोरवाडकर यांनी बहिरमचा जामीनासाठी विरोध केला. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. झुंजार आव्हाड यांनी युक्तवाद केला. ते म्हणाले की, बहिरम याने यापूर्वीही धान्य घोटाळ्यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यातून जिल्ह्याची प्रतिमा भ्रष्टाचारामुळे डागाळली आहे. पुढील तपास पूर्ण झालेला नसल्याने बहिरम यास पोलीस कोठडी द्यावी. न्यायाधीश मोरे यांनी मागणी मान्य करत बहिरमला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात अ‍ॅड. झुंजार आव्हाड यांना अ‍ॅड. अरुण माळोदे यांनी सहाय्य केले.

- Advertisement -

सोसायटीत ‘आपलं महानगर’चा अंकवाटप

आपलं महानगर दैनिकात रविवारी लाचखोर बहिरमचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी बहिरम राहत असलेल्या सोसायटीतील प्रत्येक प्लॅटधारकास दै. आपलं महानगरचा अंक दिला. बहिरम नसून, बेरहेम आहे. तो लाचखोर असून, देशद्रोही आहे. भ्रष्टाचार हा देशाला लागलेली कीड आहे. त्यास नोकरीतून काढून टाकले पाहिजे, असे भावे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -