घरठाणेएसी लोकलला आमचा विरोध नाही, पण...; बदलापुरात रेल्वे प्रवासी परिषदेत प्रवाशांनी मांडली...

एसी लोकलला आमचा विरोध नाही, पण…; बदलापुरात रेल्वे प्रवासी परिषदेत प्रवाशांनी मांडली भूमिका

Subscribe

प्रवाशांचा एसी लोकलला विरोध नाही, पण सध्या सुरू असलेल्या साधारण लोकल एसी करण्यास मात्र विरोध असल्याची भूमिका यावेळी प्रवासी आणि संघटनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याकडे मांडली.

बदलापूर – बदलापूर शहरातील रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलना मागील काही दिवसांपासून चांगलाच विरोध केलाय. यासोबतच प्रवाशांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी बदलापूरमध्ये जागृत रेल्वे प्रवासी परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. रेल्वे प्रवासी संघटनांचे प्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मसह अनेक समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत. मात्र या कायम असल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून प्रवासी एसी लोकल बंद  करण्यासाठी आग्रही आहेत. प्रवाशांचा एसी लोकलला विरोध नाही, पण सध्या सुरू असलेल्या साधारण लोकल एसी करण्यास मात्र विरोध असल्याची भूमिका यावेळी प्रवासी आणि संघटनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याकडे मांडली.

रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस चर्चा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी संध्याकाळी बदलापूरतील संजीवनी मंगल कार्यालयात जागृत रेल्वे प्रवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सिडकोचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेला रेल्वे प्रवासी संघटनेचे सुधाकर पतंगराव, विश्वास नरसाळे, मंगला वाघे तसेच प्रवीण खरात, अविनाश देशमुख, अनिसा खान आदी उपस्थित होते. बदलापुरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले होम प्लॅटफॉर्मचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, वांगणी दिशेला असलेला पादचारी पूल असूनही अनेक वर्षे तो प्लॅटफॉर्मला जोडण्यात आलेला नाही. त्यामुळे पश्चिमेकडील हेंद्रेपाडा व इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांना छोट्याश्या बोळीतून जावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisement -

बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ व२ वर पूर्णपणे शेड न उभारता एखाद्या उद्यानाप्रमाणे छोट्या छोट्या शेड तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करत व पावसाळ्यात भिजत प्रवास करावा लागत आहे, याकडे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले. शौचालयांची स्वच्छता राखली जावी, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकात जीआरपी व आरपीएफ तैनात असावेत, रेल्वे अपघातात जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी,यासाठी रुग्णवाहिका व इतर बाबींची व्यवस्था तातडीने व्हावी,अशाही मागण्या करण्यात आल्या.

दर दहा मिनिटांनी एक लोकल हवी

पश्चिम रेल्वेवर दर तीन मिनिटांनी एक लोकल उपलब्ध असते. त्याप्रमाणे शक्य नसेल तर किमान दर दहा मिनिटांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लोकल उपलब्ध व्हावी अशी मागणी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. यासंदर्भात पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

एसी लोकल परवडणारी नाही

सर्वसाधारण लोकल व एसी लोकलच्या दरात मोठी तफावत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकल परवडणारी नसल्याचे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. त्याचबरोबर एसी लोकलला आमचा विरोध नाही. परंतु सर्वसाधारण लोकल रद्द करून एसी लोकल चालवण्यास मात्र विरोध असेल असे त्यांनी सांगितले. दोन सर्वसाधारण लोकलच्या मध्ये असलेल्या वेळात शक्य असल्यास एसी लोकल चालवल्यास हरकत नसल्याचेही मत प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. बदलापूरतील सुमारे १ हजार रेल्वे प्रवाशांनी एसी लोकल संदर्भात निवेदने दिली असून त्यामध्ये हीच भूमिका मांडण्यात आले असल्याचे सुधाकर पतंगराव यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरणार: प्रमोद हिंदुराव

रेल्वे प्रवाशांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील महिन्यात आपण दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह रेल्वे मंत्री तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. तत्पूर्वी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशीही रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात चर्चा केली जाईल. या समस्यांची रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनही करू,असा इशारा प्रमोद हिंदुराव यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -