घरमहाराष्ट्रराज्यात पुन्हा निर्बंध? २ दिवसांत निर्णय घेण्याचे आरोग्यमंत्र्यांचे सूतोवाच!

राज्यात पुन्हा निर्बंध? २ दिवसांत निर्णय घेण्याचे आरोग्यमंत्र्यांचे सूतोवाच!

Subscribe

गेल्या ८ महिन्यांपासून राज्यात आणि लॉकडाऊन आणि नंतर मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनलॉक हे टप्पे पार पडले आहेत. मात्र, तरीदेखील कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. दुसरीकडे कोरोनाबाबत सामान्यांमध्ये गांभीर्य कमी होत असल्याचं देखील दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रविवारी जनतेशी साधलेल्या ऑनलाईन संवादामध्ये तसे सूतोवाच केले होते. त्यात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘राज्यात लॉकडाऊन नसला, तरी आधीचे निर्बंध पुन्हा लागू होऊ शकतात’, असे संकेत दिले आहेत.

राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भूमिका मांडली आहे. ‘राज्यात लोकांमध्ये बिनधास्त वृत्ती वाढू लागली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागणार आहेत. हा लॉकडाऊन जरी नसला, तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील. पुढच्या २ दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक होऊन त्यानंतर यासंदर्भात घोषणा केली जाईल. राज्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नाही, म्हणून पावलं उचलावी लागणार आहेत’, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

लोकल सर्वांसाठी तूर्तास नाहीच

दरम्यान, मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा सध्या राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. दसरा-दिवाळीच्या काळात बाजारांमध्ये वाढेली गर्दी, लोकांचं बेजबाबदार वर्तन यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. त्यामुळे लग्नसमारंभात देखील उपस्थित नागरिकांची मर्यादा २०० वरून ५० वर आणणे, मास्क न वापरणाऱ्यांना दिल्लीप्रमाणेच दंड आकारला जाणे अशा उपायांवर राज्य सरकार विचार करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -