घरमहाराष्ट्रपेणमधून देश-विदेशात लाखो मूर्ती रवाना

पेणमधून देश-विदेशात लाखो मूर्ती रवाना

Subscribe

गणपती बाप्पांच्या आगमानाला अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने शहरासह तालुक्यातील मूर्ती कारखान्यांतील कामाला प्रचंड वेग आला आहे. आतापर्यंत जवळपास १ लाख मूर्ती परदेशात रवाना झाल्या असून, मुंबईसह राज्याच्या विविध भागात, तसेच परप्रांतात लाखो मूर्ती नेण्यात आल्या आहेत.

– प्रदीप मोकल

पेण : गणपती बाप्पांच्या आगमानाला अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने शहरासह तालुक्यातील मूर्ती कारखान्यांतील कामाला प्रचंड वेग आला आहे. आतापर्यंत जवळपास १ लाख मूर्ती परदेशात रवाना झाल्या असून, मुंबईसह राज्याच्या विविध भागात, तसेच परप्रांतात लाखो मूर्ती नेण्यात आल्या आहेत. पेण नगरी गणेश मूर्तींची पंढरी म्हणून ओळखली जात असून, यावर्षी २५ ते ३० लाख मूर्तींच्या विक्रीतून १२५ कोटींहून अधिक रकमेची उलाढाल होण्याचा अंदाज महाराष्ट्र राज्य मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. वस्त्रांसह विविध आकर्षक अलंकारांनी सजलेल्या मूर्तींना यंदा विशेष मागणी आहे.

- Advertisement -

आकर्षक मूर्ती, सर्वोत्तम रंगकाम यामुळे येथील मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. काळाच्या ओघात कार्यशाळांसाठी शहरातील जागा अपुरी पडू लागल्याने मूर्ती व्यवसाय छोट्या गावांकडे पसरू लागला. आजमितीला शहरात ६०० पेक्षा अधिक कार्यशाळा किंवा कारखाने असून, त्यापेक्षा अधिक कार्यशाळा हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, दादर, उंबर्डे, गडब, कांदळेपाडा, शिर्की, वडखळ आदी गावांतून आहेत.

या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने यातून पाच ते सहा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसांतच मूर्तीकामाला सुरुवात होत असून, ही वेळसुद्धा कमी पडत असल्याचे मूर्तीकार सांगतात.

- Advertisement -

आकर्षक रंगकाम हे पेणच्या मूर्तींचे वैशिष्ट्य ठरत आले आहे. यावर्षी विविध वस्त्रालंकारानी मूर्तींना अक्षरशः चार चाँद लावले असून, गणेशभक्तांचा अशा मूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सोवळे, शेला, पागोटे, याचबरोबर विविध आभूषणांमुळे मूर्ती देखण्या झाल्या असून, दुसरीकडे यामुळे हस्तकला व्यवसायही बहरला आहे. विशेष बाब म्हणजे वस्त्रालंकारयुक्त मूर्तींना परदेशातही मागणी आहे.

दीड ते दोन फुटाची वस्त्रालंकार केलेल्या मूर्तीची किंमत ३ ते ४ हजार, तर हिरेजडीत ४ ते ५ हजार रुपये इतकी आहे. या मूर्तींची मागणी वाढल्याचे गडब येथील श्रीयोग आर्टस्चे नितीन पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत शहरासह तालुक्यातून अमेरिका, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, आफ्रिका, आखातात गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत. याशिवाय गुजरात , मध्यप्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातही मूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत.

मूर्तीकाम व्यवसायात शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हे तरुण दिवस-रात्र राबून मूर्ती वेळेत तयार करण्यासाठी धडपडत आहेत. धोंडपाडा, उंबर्डे आणि इतर गावांतील कामगारांचा यात समावेश आहे. हे कामगार रोजंदारीवर काम करीत असून, त्यांना ४०० ते ५०० रुपये मोबदला दिला जातो. तर जुन्या कामगारांना ६०० ते ७०० रुपये दिले जातात. आखणी कामाला छोट्या मूर्तीसाठी २० ते ४० रुपये मोजले जातात. शेवटच्या दोन महिन्यांत रात्रपाळीसाठी प्रत्येक तासाला ४० ते ५० रुपये दिले जातात. ५ ते ६ हजार कामगार या व्यवसायात राबत आहेत.

मातीची मूर्ती तयार करण्याची पहिली संकल्पना पेण येथे साकारली. अगदी सुरुवातीला शेजारील डोंगरावरील माती आणून मूर्ती तयार केली जात होती. चुना, हळद, हिंगुळ, रेवाचिनी, दिव्याची काजळी, सोनेरी वर्खाची पाने वापरून मूर्तीच्या अंगावरील वस्त्र, दागिने आणि अवयवांचे रंगकाम केले जात होते. पुढे या मूर्तींची जशी मागणी वाढू लागली तसा येथील मूर्तीकारांना व्यापक विचार करावा लागला.

शाडूची माती येथे उपलब्ध नसल्याने ती गुजरात राज्यातून आणावी लागते. तर या उद्योगासाठी लागणारे रंग, गोंद, कुंचले, ब्रश, अभ्रक, पॉलिश पेपर आदी साहित्य मुंबई-पुण्याहून आणले जात आहे. शाडूच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्या तरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची अधिक मागणी आहे. किमतीला कमी आणि वजनाला हलकी हे त्यामागील मुख्य कारण आहे.

वडखळ परिसरातील जेएसडब्ल्यू कंपनीने तालुक्यातील सर्व गणेशमूर्तीकारांसाठी पर्यावरणपूरक, पाण्यात विरघळणारे आणि शरीराला हानीकारक नसणारे रंग पुरविले आहेत. यासाठी शहरात तीन दिवसांचा रंगमहोत्सव भरवून प्रत्येक कारखानदाराला किमान ११ ते १२ हजार रुपये किमतीचे पर्यावरणपूरक रंग दिल्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या तीन दिवसांत १ हजार मूर्तीकारांनी उपस्थिती दर्शवून यावर्षी किमान ५ लाखांहून अधिक गणेशमूर्ती पर्यावरणपूरक रंगाने रंगवल्या गेल्या आहेत.

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, यामध्ये शाडुची माती, प्लास्टर, रंग, यासह विजेचे दर, मजुरीचे वाढलेले दर, वाहतुकीचे वाढलेला खर्च यामुळे मूर्तीच्या दरात वाढ करावी लागली असली तरी सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल अशाही दरात मूर्ती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५०० पासून थेट १५ हजार रुपयांपर्यंत मूर्तींच्या किमती आहेत.


हेही वाचा – मुंबई महापालिकेभोवती चौकशीचा फास; महालेखा परीक्षकांकडून विशेष ऑडिट करणार : देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -