…आता सहन होत नाही, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आमदार राजू पाटलांचा संताप

MNS MLA Raju Patil

डोंबिवली – टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर केंद्र सरकारने कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. सीटबेल्ट बांधणे सुरक्षेच्या दृष्टीने जसे अनिवार्य केले आहे. तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरद्वारे केली आहे. ठेकेदारांचा गलथानपणा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असून खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहेत, हे आता सहन होत नाही, असे म्हणत आमदार पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

राजू पाटील नागरी समस्यांबाबत अत्यंत संवेदनशील आमदार म्हणून ओळखले जातात. याचे कारण ते शहरातील प्रत्येक समस्येवर सोशल मिडीया आणि ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून पुन्हा एकदा ट्विट केले असून हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि आधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा, अशी चक्क मागणी केली आहे. त्यामुळे हे ट्वीट चांगलेच  चर्चेत आले आहे.

गणेशोत्सवापूर्वी सर्वच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच महापालिका आयुक्तांना व संबंधित प्राधिकरणाला दिले होते. गणेशोत्सव सुरू होऊन आठ दिवस उलटून गेले आहे. तरीही अजूनपर्यंत कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. याच खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. कल्याण डोंबिवलीकरांना भेडसवणाऱ्या महत्वाच्या समस्या म्हणजे उपनगरी लोकलमधील प्रवाशांची गर्दी आणि रस्त्यांवरील खड्डे हे विषय वर्षानुवर्षे कायम आहेत. हे प्रश्न कायमचे निकाली काढण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच आमदार राजू पाटील यांनी या ट्विटमध्ये आता सहन होत नाही, म्हणत आपला संताप देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचे ते ट्विट आता चांगलेच चर्चेत आले आहे.


हेही वाचा : प्रत्येकाला चांगल्या गोष्टींचा मोह म्हणून बारामती हवी, सुप्रिया सुळेंचा भाजपला