घरमहाराष्ट्रमहापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर

महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर

Subscribe

मुंबईत सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गणेशोत्सवादरम्यानच्या भेटीगाठींमुळे या तिन्ही नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचे म्हटले जात होते. याच आधारे मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसेत युती होणार, भाजपकडून शिंदे गट आणि मनसेला जागा सोडण्यात येणार, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली. यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेने एकला चलो रेचा नारा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आगामी काळात सर्व महानगरपालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. त्याशिवाय आम्ही मुंबईतही २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही स्वतंत्र आहोत, सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. यामुळे मनसे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील सर्वच मुख्य महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, इतका मसाला आज मिळणार नाही, पण डबे जोडण्याचे काम सुरू आहे, असे सूचक विधान केले होते. या विधानामुळे शिंदे गट आणि मनसेमध्ये युती होण्याची चर्चा सुरू होती.

राज ठाकरे १८ सप्टेंबरपासून विदर्भ दौर्‍यावर जाणार आहेत. ठाकरे १७ सप्टेंबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील.१८ सप्टेंबरला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम राहील. या काळात ते विदर्भातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करतील. २० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे २१ सप्टेंबरला अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यासाठी निघतील. तेथे २ दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते २३ ला मुंबईकडे रवाना होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -