घरमहाराष्ट्रअंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना १५ एप्रिलपासून सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या होत्या. सध्या राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता यंदाही विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या मे महिन्यामध्ये होणार्‍या परीक्षा ऑनलाईनच घेण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांना बहुपर्यायी प्रश्नांद्वारे तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना ५० टक्के बहुपर्यायी तर ५० टक्के वर्णनात्मक प्रश्न अशा प्रकारे परीक्षांचे आयोजन महाविद्यालयस्तरावर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने बुधवारी जाहीर केले.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा नेमक्या कशा होणार याबाबत संदिग्धता होती. याबाबत परिपत्रक काढून विद्यापीठाने स्पष्टीकरण केले आहे. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार सत्र १ ते ४ च्या नियमित व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ एप्रिल ते ५ मेदरम्यान घेण्यात येणार आहेत. सत्र ६च्या नियमिक व बँकलॉगच्या परीक्षा ६ ते २१ मेदरम्यान, सत्र ५च्या बॅकलॉगच्या परीक्षा २४ मे ते २ जूनदरम्यान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षांचे नियोजन हे क्लस्टर महाविद्यालये या संकल्पनेनुसारच होणार आहे.

- Advertisement -

यातील प्रमुख महाविद्यालयांवर त्यांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी असणार आहे. तोंडी परीक्षा ५ एप्रिलपासून विविध मिटींग अ‍ॅप्सच्या माध्यमातून घेण्याचे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवली आहे, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

अशी होणार परीक्षा
कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यात ५० बहुपर्यायी प्रश्न असून त्यासाठी एक तासांचा कालावधी असणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ८० गुणांची होणार आहे. यात ४० गुण हे बहुपर्यायी प्रश्नांसाठी तर ४० गुण हे वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दोन तास वेळ देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -