घरमहाराष्ट्रनाशिकभूमी अभिलेख कार्यालयाला घातला थेट 'चपलांचा हार'; पण का ?

भूमी अभिलेख कार्यालयाला घातला थेट ‘चपलांचा हार’; पण का ?

Subscribe

मनमाड : येथील सतत बंद असणारे भूमि अभिलेख (सिटीसर्वे) कार्यालयाच्या विरोधात आरपीआयने आक्रमक भूमिका घेऊन मंगळवार (दि. १) बंद असलेल्या कार्यालयाच्या दरवाज्याला चपलांचा हार घालून आंदोलन केले. सिटी सर्व्हेचे कार्यालय नेहमीच बंद असते. त्यामुळे शहरासोबत ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मनमानी करून जनतेला वेठीस धरणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाईचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे, अ‍ॅड. प्रमोद अहिरे यांनी केली.

जमीन, घर, प्लॉटची खरेदी-विक्रीची नोंद, सात-बारा उतारा, नकाशे, शेती संबंधित कागदपत्रे या सर्वांचा संबंध भूमिअभिलेख कार्यालयाशी येत असल्यामुळे शहरापासून गावखेड्यापर्यंत सर्वच नागरिकांना या कार्यालयात यावे लागते. मनमाडला हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले मौलाना अब्दूल कलाम आझाद हॉलमध्ये आहे. मात्र सदर कार्यालय नेहमीच बंद असते त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिक या कार्यालयाचे उंबरठे झिजवून कंटाळतात तरी त्यांचे काम होत नाही असा आरोप रिपाईचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे, अ‍ॅड. प्रमोद अहिरे यांनी करून आज थेट या कार्यालयाच्या बंद असलेल्या दरवाज्यावर चपलांचा हार घालून आगळे वेगळे आंदोलन केले. येथे कार्यरत असलेले अधिकारी नितनवरे हे कायम मोजणीला आहे, मिटिंगला आहे असे सांगून ऑफिस बंद ठेवतात. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांचे प्रलंबित कामे आहे तेही करण्यात येत नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मनमानीविरुद्ध आम्ही आंदोलन केले असल्याचे निकाळे, अहिरे यांनी सांगितले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची तात्काळ दखल घेत कारवाई करावी अन्यथा याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या दोघांनी दिला. यावेळी रिपाईचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisement -

दरम्यान, मनमाडसोबत नांदगावचे सिटी सर्वे कार्यालय देखील याच कारणामुळे चर्चेत आहे. येथील कामकाज आणि नागरिकांची होत असलेल्या गैरसोईची दखल घेऊन थेट आमदार सुहास कांदे यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले होते. काही महिन्यांपूर्वीच येथील एका अधिकार्‍याला लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. तरी देखील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हम करे सो कायदा या प्रमाणे वागून जनतेला वेठीस धरत आहे. या कार्यालयाच्या कामकाजाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -