घरमहाराष्ट्रनाशिकपाऊस न पडताच मनमाडचा पाणीप्रश्न सुटला; तळ गाठलेल्या 'वाघदर्डी' धरणात आले पाणी

पाऊस न पडताच मनमाडचा पाणीप्रश्न सुटला; तळ गाठलेल्या ‘वाघदर्डी’ धरणात आले पाणी

Subscribe

नाशिक : पावसाळा निम्मा सरून गेला तरी मनमाड शहराची तहान भागवणारे वाघदर्डी धरण कोरडेठाक पडले होते. मनमाड शहरात तब्बल 20 ते 25 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत होता. अश्यातच 2 दिवसपूर्वी जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसला तरी पालखेड धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे तेथून मनमाडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे किमान काही दिवसांची तरी पाण्याची समस्या दूर झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.

गाठला होता तळ वाचा सविस्तर… मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाने गाठला तळ, चिंतेत वाढ

- Advertisement -

भर पावसाळ्यात तीव्र टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पूर पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि. 11) पालखेडमधून सोडण्यात आलेले पाणी मनमाड नगरपालिकेच्या पाटोदा येथील साठवणूक तलावात पोहचले. तेथून पाणी वाघदर्डी धरणात घेतले जाणार आहे. त्यामुळे मनमाड शहराची तहान भागणार आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहू लागली. पालखेड धरण जवळपास 84 टक्के भरले. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी हे पाणी मनमाडच्या साठवणूक तलावात आले. पाटोदा येथे पालिकेने हे पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी यंत्रणा सक्षम ठेवली होती. त्यामुळे हे पाणी पूर्ण क्षमतेने पंपिंगद्वारे वाघदर्डी धरणात घेतले जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे चटके सहन करणाऱ्या मनमाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी 270 अश्वशक्तीचे तीन आणि 200 अश्वशक्तीचे दोन पंप सज्ज असून त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. पालखेड धरणाचे पूर पाणी सोडण्यात येणार असल्याने पाटोदा येथील सहा पंप आणि अन्य यंत्रणेची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. हे पूर पाणी वाघदर्डी धरणात घेतले जात आहे. या पूर पाण्यामुळे मनमाड शहराची पाणी टंचाईची दाहकता काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा अभियंता व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.

पालखेडचे पूर पाणी पाटोदा येथे पोहचले आहे. तेथे सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित असल्याने जास्तीत जास्त पाण्याचा उपसा करून ते वाघदर्डी धरणात घेतले जात आहे. या पूर पाण्याचा मनमाडकरांना फायदा होणार आहे. पाणीटंचाई काही अंशी दूर होण्यास मदत होई : शेषराव चौधरी, मुख्याधिकारी, मनमाड नगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -