घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात राबविणार धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियान

जिल्ह्यात राबविणार धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियान

Subscribe

गरजू रूग्णांना मिळणार मोफत उपचार

नाशिक :  जिल्हाभरात धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि.१२) केली. प्रजासत्ताक दिनापर्यंत (दि. २६ जानेवारी) चालणार्‍या या उपक्रमांद्वारे गरजू रूग्णांवर मोफत उपचार केले जातील. तसेच, जनतेला त्यांच्याच घराजवळच्या परिसरात जागेवरच विविध दाखले, रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जातील, असेही पालकमंत्री भुसेंनी सांगितले.

महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या गटाअंतर्गत धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करतील. यात आशासेविकांची मदत घेण्यात येईल. ज्या रूग्णांवर तातडीने तालुका किंवा जिल्हा स्तरावर उपचाराची गरज आहे, त्यांना तातडीने तेथील रूग्णालयांमध्ये हलविले जाईल. तसेच, जिल्हास्तरावर उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा नाही, अशा रूग्णांवर मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार केले जातील.

- Advertisement -

रूग्णांवर शासनाच्या विविध योजनांमधून मोफत उपचार केले जाणार असून, त्यांना घरापासून नेण्याची व आणून सोडण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असेदेखील ना. भुसे यांनी सांगितले. जिल्ह्यात हाती घेण्यात येणार्‍या महाराजस्व अभियानामध्ये शासन आपल्या दारी उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार आहे. त्याअंतर्गत आठवड्यातील दोन दिवस अधिकारी-कर्मचारी हे त्या-त्या भागांमध्ये जाऊन नागरिकांना आवश्यक ते दाखले, रेशनकार्ड तसेच अन्य सुविधा जागेवर उपलब्ध करून देतील. या शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी अगोदरच नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष शिबिरावेळी कागदपत्रांची अपूर्ततेचा मुद्दा अडचणीचा राहणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांत आरोग्य शिबिराचे वेळापत्रक घोषित करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुसे यांनी दिली. तसेच, शिबिरासाठी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देऊ केला आहे. त्यात रूग्णांसाठी आवश्यक मोफत चष्मे, जयपुर फुट व अन्य वस्तू देण्याची तयारी संबंधित संस्थांनी दाखविल्याची माहिती भुसेंनी दिली.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -