घरमहाराष्ट्रनाशिकऔषध खरेदीवरुन झेडपीत रणकंदन

औषध खरेदीवरुन झेडपीत रणकंदन

Subscribe

2018 मध्ये हापकिन कंपनीने सात कोटी रुपये जिल्हा परिषदेला परत का केले?

नाशिक: जिल्हा परिषद आरोग्य विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले विजय देवरे व फैयाज खान हे दोन अधिकारीच झेडपीचे सर्वस्व असल्यामुळे त्यांच्या बदलीचा मुद्दा ‘हॉट’ ठरलेला असाताना सभागृहात हा विषय उपस्थित होण्यापूर्वीच शिवसेना व राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालत प्रशासनाचा बचाव केला. त्यामुळे या कर्मचार्‍यांवरील बदलीची टांगती तलवार अजूनही कायम असून पुढील महिन्यात याविषयी स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.7) सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या प्रांरभी डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी आरोग्य विभागाचे प्रश्न उपस्थित केले. परंतु, इतर नियमित विषयांवर चर्चा पूर्ण झाल्यानंतर 21 क्रमांकाच्या आरोग्य विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्याची भूमिका सदस्यांनी घेतली. भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी आरोग्य विभागाचे मुद्देसूदपणे ‘पीएम’ करत औषध खरेदीत कुणाचा ‘इंटरेस्ट’ आहे हे सभागृहात दाखवून दिले. आजवर हापकिन या कंपनीकडूनच औषध खरेदी केली जात होती तर 2018 मध्ये या कंपनीने सात कोटी रुपये जिल्हा परिषदेला परत का केले? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

आरोग्य विभागाने हाफकिनकडे मागणीच नोंदवली नाही. म्हणून हे पैसे त्यांनी परत केले. योग्यवेळी मागणी नोंदवली असती तर दुसर्‍या लाटेत नागरिकांचे झालेले मृत्यू वाचवता आले असते, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांची बोलती बंद झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डॉ.आहेर यांचा बचाव केला. औषध खरेदीत किमान मुल्य हे अंदाजे ठरवले जाते. त्यासाठी तज्ज्ञ समितीही नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, 18 नोव्हेंबर रोजी तडजोडीची बैठक झालेली असताना सर्वसाधारण सभेत आयत्या वेळी हा विषय का घेण्यात आला, याविषयी मात्र त्यांचीही बोलती बंद झाली. प्रशासन हतबल होण्याच्या मार्गावर असताना शिवसेना व राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळातच 52 लाखांच्या खरेदीस मान्यता देण्यात आली.

पवार-गावित यांच्यात खडाजंगी:

औषध खरेदीच्या मुद्यावर सभागृहात जोरदार चर्चा सुरु असताना मनिषा पवार यांनी प्रतिनियुक्तीचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर माजी उपाध्यक्षा नयना गावित यांनीही आपले मत व्यक्त करत फक्त दोनच कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत का? सर्वांचीच माहिती मागवा. मग कारवाई करा, असा मुद्दा लावून धरला. त्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढल्याने सभागृहात एकच कल्लोळ झाला. त्यातच मनिषा पवार व नयना गावित यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ झाले.

- Advertisement -

 

 ठळक घडामोडी

  • सहा महिन्यांपासून सफाई कर्मचार्‍यांना वेतन नाही
  • बेडने आरोग्य विभागास मिळाले सांगाडे : शिरसाठ
  • पाणीपुरवठा योजनांमध्ये येवल्याचाही समावेश करण्याची सभापती संजय बनकर यांची मागणी
  • पाच वर्षांपासून आरोग्य केंद्राची मागणी करणार्‍या कविता धाकराव यांना
    अश्रू अनावर 
  • द्वरुक्ती होत असलेले जनसुविधेची कामे होणार रद्द
  • गोदावरीत सांडपाणी सोडणार्‍या महापालिकेकडून भरपाई घेण्याचा सिध्दार्थ वनारसेंचा ठराव
  • पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार; सीईओ करणार मध्यस्थी
  • दोन वर्षांपासून वेतनेतर अनुदान कमी झाल्याने कर्मचार्‍यांचे वेतन रखडले
  • त्यासाठी स्वतंत्र हेड निर्माण करण्याची राज्य शासनाकडे विनंती करणार
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -