घरक्राइमठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाने ठोठावली वर्षभराची शिक्षा

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाने ठोठावली वर्षभराची शिक्षा

Subscribe

नाशिक : लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या पोलिसांवरील हल्ला केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.१५) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह तिघांना एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दरम्यान याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यातर्फे अ‍ॅड. राहुल कासलीवाल यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, अपील दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली.

ज्ञानेश्वर बडगुजर (वय २५, रा. सावतानगर, सिडको), राकेश शिरसाठ (वय ३०, रा. पाथर्डी फाटा) आणि शिवसेनेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर (४५, रा. स्वामी निवास बंगला, सूर्योदय कॉलनी, सावतानगर, नाशिक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्तांनी आयुक्तालय हद्दीत कोणत्याही प्रकाराचे हत्यार जवळ बाळगू नये, असा मनाई हुकूम आदेश जारी केलेला असतानाही शिक्षा झालेल्या तिघांनी या मनाई आदेशाचे उल्लंघन केले.

- Advertisement -

संशयित तिघांनी आपल्या गाडीत लोखंडी रॉड, प्लास्टिकचे चार रॉड, एक धारदार चाकू अशी हत्यारे ठेवली होती. फिर्यादी असलेले पोलीस कर्मचारी तथा सहायक पोलीस आयुक्त राजपूत हे सरकारी काम करत असताना कामात अडथळा आणत तिघेही आरोपी सहायक पोलीस आयुक्तांच्या अंगावर धावून गेले. तसेच, तू राष्ट्रवादी पक्षाला मिळाला आहेस. तू आमचे काहीएक वाकडे करू शकत नाही, अशा शब्दांत मोठमोठ्याने ओरडत अरेरावी केली. तसेच, सहायक पोलीस आयुक्त राजपूत यांना ढकलले.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तात्कालीन सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. जाधव यांनी केला. त्यांनी आरोपींविरूद्ध सबळ पुरावे संकलित करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. बुधवारी (दि.१५) जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. जे. मोरे यांनी गुन्ह्यातील आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय अन्य कलमांतर्गत सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षादेखील सुनावली.

२४ एप्रिल २०१४ लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी रायगड चौक मतदान केंद्रावर वाद झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता कोणताही दोष नसताना त्यावेळी चुकीचा गुन्हा आमच्यावर दाखल केला. परंतु, त्याच दिवशी पोलिसांनी शहरात १४ ठिकाणी सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले. त्यात १३ व्यक्ती निर्दोष सुटले. परंतु, मला नैसर्गिक न्याय मिळाला नाही, याची खंत आहे. नैसर्गिक न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल. : सुधाकर बडगुजर, माजी सभागृह नेते, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -