घरदेश-विदेशराष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

Subscribe

घटलेल्या मतांच्या टक्केवारीसह इतर तांत्रिक बाबींच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. भाजपविरोधात आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तिन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने दिलेला हा मोठा दणका आहे.

याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने या तिन्ही पक्षांकडून खुलासा मागवत या पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाचा आढावा घेतला होता, तर दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरातमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती, तर १० जानेवारी २००० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता.

- Advertisement -

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक अटी आहेत. यापैकी कुठल्याही तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाने २ टक्के जागा जिंकणे, लोकसभेच्या ४ जागांसोबतच लोकसभेतील किमान ६ टक्के किंवा विधानसभा निवडणुकीत ४ किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या मतांपैकी किमान ६ टक्के मते मिळवणे, ४ किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असणे आवश्यक आहे. यापैकी कुठलीही एक अट पूर्ण करणार्‍या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

देशातील सध्याचे राष्ट्रीय पक्ष
भाजप, काँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष, राष्ट्रीय पीपल्स पार्टी, आम आदमी पक्ष

- Advertisement -

काय नुकसान होणार
निवडणूक चिन्ह आदेश १९६८ अंतर्गत पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यामुळे हे पक्ष देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रत आम्हाला मिळाल्यानंतर यावर कायदेशीर विचार करावा लागेल. १५-२० दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जाबाबत आमची बाजू मांडण्याची मुभा दिली होती. आम्ही राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.
– सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -