घरमहाराष्ट्रNatural Disaster : राज्यातील अवकाळी पावसामुळे सहा जणांचा मृत्यू, एक लाख हेक्टर...

Natural Disaster : राज्यातील अवकाळी पावसामुळे सहा जणांचा मृत्यू, एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान

Subscribe

राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून या आपत्तीत 161 जनावरे दगावली आहेत. याशिवाय अंदाजे 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून या आपत्तीत 161 जनावरे दगावली आहेत. याशिवाय अंदाजे 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्याला या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त आहे. अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्या दोन दिवसात आतापर्यंत सुमारे 16 जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. त्याचा फटका रब्बी हंगामातील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांना बसला आहे. कृषी, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस परिणामी त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सरकारची भूमिका असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत सांगितले. (Natural Disaster: Six people died due to unseasonal rain in the state, one lakh hectare area was damaged)

हेही वाचा – Unseasonal Rain : विदर्भात अवकाळीचा कहर; कापसाच्या झाल्या वाती, तूर करणार ‘चिंतातूर’

- Advertisement -

तर, ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांना या आपत्तीचा फटका बसला असून तेथे 53 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील 41 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्रंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड आणि येवला तालुक्यातील 23 हजार 8330 हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस आणि फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील 46 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, कापूस, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील 2 हजार 239 हेक्टरवरील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड आणि भडगांव तालुक्यातील 552 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले, कोपरगाव, पारनेर, राहता तालुक्यातील 15 हजार 307 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -