घरमहाराष्ट्रPanderi Dam : रत्नागिरीतील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता, खबरदारी म्हणून NDRF टीमसह...

Panderi Dam : रत्नागिरीतील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता, खबरदारी म्हणून NDRF टीमसह १०० पोलीस तैनात

Subscribe

रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटीची दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. धरणाच्या मुख्य भिंतीत कालव्याच्या मुखाशी मोठी गळती लागून लाल मिश्रित पाणी नदीला जाऊन पोहचत होते. मात्र पाण्याचा गढूळ रंग पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी धरणाला गळती लागल्याने पाणी गढळू होत असल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनंतर प्रशासनाने गळती थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरण परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करून सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मोहिमकुमार गर्ग मदतीचे आवश्यक साहित्यासह १०० पोलिसांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. या परिसरातल स्थानिक नागरिकांना घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे सांगत पोलीस धीर देत आहेत.

दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी बुधवारी दुपारनंतर धरणाची गळती रोखण्यासाठी प्रशासनाला काही प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र पावसाचा अंदाज लक्षात घेता धरणाची गळती वाढू शकते. त्यामुळे जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षा सतर्क झाली आहे. तसेच या गळतीमुळे कोणताही जीवितहानी होऊ नये म्हणून डॉ.गर्ग यांनी सहकाऱ्यांसह पणदेरी धरणाची गळती रोखण्यासाठी योग्यती पाऊले उचलली.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून पाटबंधारे विभागाच्या विविध पथकांनी याठिकाणी दिवसरात्र काम करून गळती थांबवली. तसेच धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी मुख्य कालवा व सांडव्यातून पाणी सोडण्यात आल्याने धरणावरील धोका तूर्तास टळला असून प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. धरणातून विसर्ग होणारे सांडवा व कालव्याचा मुख्य दरवाजा खुलाच ठेवण्यात येणार असून धरण पूर्णपणे रिकामे करण्यात येणार आहे. मात्र अद्यापही या धरणाची गळती रोखण्याचे काम सुरु आहे.

गळतीमुळे कोणताही जीवितहानी होऊ नये यासाठी पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथून जादा कुमक म्हणून १०० पोलीस अंमलदार रवाना करण्यात आले होते. तसेच आपत्कालीन साधन सामग्री, फायबर बोट, लाईफ जॅकेट, रिंग बोये, रोप, सर्च लाईट, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना धरण फुटून कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून पी. ए. सिस्टीम व मेगाफोनव्दारे स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन करण्यात आले. स्थलांतरित होण्याकरिता निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरित होण्याच्या सुचना करण्यात आल्या. बौध्दवाडी, रोहिदासवाडी, कोंडगाव इत्यादी वाडीतील लोकांना महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याकरिता मदत करण्यात आली.

- Advertisement -

धरणातील पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात होताना कोणतीही जीवितहानी होऊ नये या करिता पणदेरी, बहिरीवली, कोंडगाव या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, शेतीची कामे करण्यास जावू नये अशा सूचना देत बाजारपेठ बंद केली होती. धरण परिसरात सर्वसामान्य नागरिकांना बंदी केल्याने प्रशासनाला गळतीचे काम पूर्ण करणे सोपे झाले. पावसाने मेहरबानी केल्यास पुढील आठ दिवसांत गळतीच्या ठिकाणी पिचिंगचे काम पूर्ण करता येणार असल्याची माहिती उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिली.

गळती लागलेल्या ठिकाणी सिमेंटच्या रिकाम्या पोत्यातून माती भरून त्या गोण्या गळती ठिकाणी भरण्यात आल्या. आतापर्यंत सुमारे ७० ते ८० ट्रक मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य भिंतीला लागलेली गळती थांबल्याचे चित्र दिसून आले. यानंतर कोल्हापूर येथून आलेल्या मॅकेनिकल विभागाच्या पथकाने कालव्याची पाहणी करून कालव्याद्वारे पाणी सोडण्यास टेक्निकल बाबींची पडताळणी करून कालव्याचा दरवाजा पहिल्या टप्प्यात काही अंशी उघडण्यात आला. मात्र येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यास धरफुटीची शक्यता नाकारता येत नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -