घरमहाराष्ट्रउरणमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उरणमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Subscribe

नागावमधील घरावर पडले झाड, शेणी गावात पडली वीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या

उरण तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे रहिवाशांना विद्युत पुरवठा करणारे मीटर तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या आहेत. नागाव गावातील रहिवाशाच्या घरावर झाड पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती उरण तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे.

शुक्रवारी सकाळपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे उरणमधील जनजीवन विस्कळित झाले होते. उरण तहसील, उरण नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, जेएनपीटी, आपत्कालीन व्यवस्थापन तसेच संबंधित खात्याच्या प्रशासनाने पावसाळी पाणी निचर्‍याची व्यवस्थाच न केल्याने उरण शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. भाजी मंडई, व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. उरण पनवेल या रस्त्यावरील काही भागात पावसाचे पाणी साचले, तसेच सोनारी, जासई गावात सखल भागात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

- Advertisement -

नागाव गावातील रहिवासी लक्ष्मीबाई नारायण पाटील यांच्या घरावर झाड पडले. आपत्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना होती. यासंदर्भात उरण तहसिल कार्यालयाकडे विचारणा केली असता नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू आहेत, असे सांगण्यात आले. पण बरेच अधिकारी जागेवरच नसल्याने नागरिकांची भर पावसात गैरसोय होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -