घरक्रीडागुडबाय श्रीलंका

गुडबाय श्रीलंका

Subscribe

अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ श्रीलंकेचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्टे्रलिया, भारत यांनी उपांत्य फेरी गाठली असून गतवेळचे उपविजेते न्यूझीलंड, यजमान इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान या चौघांंपैकी कोणते दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतीत ते 5 जुलै रोजी बांगलादेश-पाकिस्तान लढतीनंतर स्पष्ट होईल. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेला राष्ट्रकुल क्रिकेट स्पर्धा असे म्हटले जाते. उपांत्य फेरीत राष्ट्रकुलातील 4 देशांचा समावेश असेल.

नवोदित अफगाणिस्तान अपेक्षेनुसार तळालाच राहिला. विराट कोहलीच्या भारतीय संघाला मात्र त्यांनी कडवी झुंज दिली. ‘चोकर्स’ दक्षिण आफ्रिकेची यंदा ससेहोलपट झाली. अफगाणिस्तान, श्रीलंकेवर विजय मिळविणार्‍या दक्षिण आफ्रिकेेची अखेरची लढत ऑस्टे्रलियाविरुध्द असून केवळ औपचारिकतेपुरता हा सामना खेळला जाईल. ‘चोकर्स’ नव्हे तर ‘जोकर्स’ असेच द. आफिक्रेबाबत म्हणावे लागेल. खेळाडूंच्या दुखापतींमुळे या संघाची घडी नीट बसलीच नाही. माजी विजेत्या वेस्ट इंडिजची सुरुवात फसवी ठरली. पाकचा 105 धावात खुर्दा उडविणार्‍या विंडीजला नंतर 5 पराभवांना सामोरे जावे लागले. अफगाणिस्तान, श्रीलंकेशी त्यांचे सामने बाकी असून दोन्ही सामने जिंकले तरीही विंडिजला बाद फेरी गाठता येणार नाही.

- Advertisement -

माजी विजेत्या श्रीलंकेची सुरुवात खराबच झाली. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने त्यांना 136 धावांतच गुंडाळून 10 विकेट्सनी विजय संपादला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी झटपट पॅव्हेलियनची वाट पकडली. हेन्री, फर्ग्युसन, बोल्टच्या मार्‍यापुढे श्रीलंकन फलंदाजी ढेपाळली. वर्ल्डकप स्पर्धेत 10 विकेट्सचा मारा खाण्याची आपत्ती श्रीलंकेवर प्रथमच ओढवली. कर्णधार करुणारत्नने सलामीला येत अखेरपर्यंत नाबाद राहाण्याचा पराक्रम केला, हीच श्रीलंकेची जमेची बाजू. गप्टिल, मुन्रो यांनी नाबाद 137 धावांची सलामी देताना मलिंगा, लकमल यांची गोलंदाजी फोडून काढली. 4 वर्षांपूर्वी श्रीलंकेने वर्ल्डकपमध्ये इंग्लंडवर 10 विकेटसने विजय मिळविला होता.

अफगाणिस्तानवर श्रीलंकेने अपेक्षेनुसार विजय मिळवला. परंतु लंकेच्या ढिसूळ फलंदाजीची प्रचिती पुन्हा आली. बिनबाद 92 वरुन त्यांचा डाव 37 षटकातील 201 धावांतच आटोपला. कुसाल परेराचा (78) अपवाद वगळता इतर फलंदाज फारसे काही करु शकले नाहीत. मलिंगा, प्रदीपने अफगाणिस्ततानला 153 धावात गुंडाळले. पाकिस्तान, बांगला देशविरुध्दचे सामने पावसामुळे रद्द झाल्यामुळे श्रीलंकेने (1 ़ 1 आणि 2) गुणांची कमाई केली.

- Advertisement -

गतविजेत्या ऑस्टे्रलियाच्या 335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिमुथ करुणारत्न, कुसाल परेरा यांनी 115 धावांची सणसणीत सलामी श्रीलंकेला करुन दिली. कर्णधाराला साजेशी खेळी करताना करुणारत्नने 97 धावा केल्या. तर परेराने अर्धशतक झळकावले. परंतु, इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावल्यामुळे श्रीलंकेने 247 पर्यंतच मजल मारली.

इंग्लंडला नमवण्याचा पराक्रम श्रीलंकेने वर्ल्डकपमध्ये करुन दाखवला. लसिथ मलिंगाच्या भेदक मार्‍यापुढे यजमान इंग्लंडचा डाव गडगडला. स्टोक्सने पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, त्याची झुंजार खेळी निष्फळ ठरली. इंग्लंडच्या या पराभवामुळे वर्ल्डकप स्पर्धेत चुरस निर्माण झाली. इंग्लंडला धूळ चारणार्‍या श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेने सहज हरविले. रबाडा, मॉरिस, प्रिटोरियस यांच्या तेज मार्‍यापुढे श्रीलंकन संघ जेमतेम 203 पर्यंत मजल मारु शकला. हाशिम अमला, फॅफ डु प्लेसिस यांनी 175 धावांची अभेद्य भागीदारी रचून द.आफ्रिकेला मोठा विजय मिळवून दिला. या पराभवामुळे श्रीलंकेच्या बाद फेरीतील प्रवेशाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

करुणारत्नेच्या श्रीलंकन संघाने अलिकडेच दक्षिण आफ्रिकेविरुध्द कसोटी मालिका 2-0 अशी जिंकण्याचा भीमपराक्रम केला. भारत, पाकिस्ततानला जे जमले नाही ते करुणारत्नच्या श्रीलंकन संघाने करून दाखविले. परंतु वर्ल्डकपमध्ये ढिसूळ फलंदाजीने श्रीलंकेचा घात केला. कर्णधार दिमुथ करुणाारत्नला कुसाल परेराची थोडीफार साथ लाभली. तर इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात माजी कर्णधार अँजेलो मॅथ्युजने 86 धावांची दमदार खेळी केल्यामुळे श्रीलंकेने व्दिशतकी मजल मारली. या स्पर्धेत श्रीलंकन फलंदाजांना भागीदारी रचण्यात अपयश आले तीच बाब श्रीलंकेच्या पराभवाला प्रामुख्याने कारणीभूत ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -