घरमहाराष्ट्रउन्हाचा पारा चढला, रानमेवा पसंतीत उतरला

उन्हाचा पारा चढला, रानमेवा पसंतीत उतरला

Subscribe

उन्हाचा पारा चढला असून, अंगाची लाही लाही करणार्‍या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना कडक उन्हात रसाळ, मधूर आणि मन तृप्त करणारा रानमेवा बाजारात दाखल झाला आहे. औषधी गुणधर्म असणारा रानमेवा स्थानिकांसह पर्यटकांच्याही पसंतीस उतरत आहे. या रानमेव्यापासून अनेक पदार्थ बनविण्यात येत असून, त्याची लज्जत वर्षभर घेण्याचा प्रयत्न सार्‍यांचा असतो. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो महिलांना रानमेव्याच्या विक्रीतून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. करवंद, जांभूळ, आवळा, जाम आदी फळांचा रानमेव्यात समावेश आहे.

सर्वत्र उन्हाचे चटके जाणवू लागले असून. अंगाच्या लाही लाही होणार्‍या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उकाड्यापासून बाजारात आलेला रानमेवा नागरिकांना दिलासादायक वाटत आहे. पर्यटकांसह स्थानिकही बाजारपेठांमध्ये रानमेव्याची खरेदी करताना दिसून येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात करवंद, जांभूळ, आवळा, जाम या रानमेव्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. हा सर्व रानमेवा सकाळी टोपलीत घेऊन ग्रामीण भागातील महिला बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. कडक उन्हात रसाळ, मधूर, औषधी रानमेवा पर्यटकांसह स्थानिकांच्या पसंतीस उतरत आहे. रानमेव्यापासून लोणचे, मोरांबा, कॅन्डी, सरबत, बनविण्यात येते. त्यामुळे रानमेवा खरेदी करून त्याची लज्जत वर्षभर घेण्यासाठी रानमेव्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे संगीता म्हात्रे व निलम पाटील या रानमेव्याची विक्री करणार्‍या महिलांनी सांगितले.

रानमेव्यापासून लोणचे, मोरांबा, कॅन्डी, सरबत, लोणचे बनविण्यात येते. यासाठी स्थानिकांना प्रशिक्षणाची गरज असून, प्रशिक्षण मिळाल्यास चांगली उत्पादने तयार करून त्यांची विक्री करणे शक्य होईल. सरकारचे मात्र यागोष्टीकडे दुर्लक्ष आहे. केंद्र व राज्य सरकार देशातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना जाहीर करीत आहे, या योजनेत बचत गटांच्यामार्फत अशा योजना सुरू करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण दिल्यास त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकेल. त्यासाठी नियोजनाची आवश्यकता असून, या विक्रीतून या ग्रामीण भागातून लाखो रुपयांची उलाढाल प्रत्येक वर्षी होईल.
– निकीता पाटील
व्यावसायिक, गृहपयोगी वस्तू

- Advertisement -

रानमेवा किमती (वाट्यानुसार)

करवंद – 40 ते 50 रु.
जांभूळ – 30 ते 50 रु.
जाम – 20 ते 30 रु.
आवळा – 25 ते 30 रु.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -