घरताज्या घडामोडीHanuman Chalisa: मातोश्रीसमोर उद्या हनुमान चालीसा पठण करणारच, राणा दांपत्य ठाम

Hanuman Chalisa: मातोश्रीसमोर उद्या हनुमान चालीसा पठण करणारच, राणा दांपत्य ठाम

Subscribe

महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी, संकटांवर मात करण्यासाठी शनिवारी २३ एप्रिलला सकाळी ९ वाजता मातोश्रीसमोर आम्ही दोघेही हनुमान चालीसा वाचण्यासाठी जाणार आहोत. आम्ही इथे गोंधळासाठी, मुंबईकरांना त्रास द्यायला आलेलो नाही. महाराष्ट्रात संकट सुरू आहे, त्यासाठीच मातोश्रीची वारी करणार आहे. मातोश्रीवर जायला विरोध असेल तर त्याला सामना करण्याची तयारी असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले. खार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही कायदा सुव्यवस्थेचे पालन करत आहोत. पोलिसांना सहकार्य करत हनुमान चालीसा वाचणार आहोत. तसेच मुंबईकरांना कोणताही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या हिंदुत्वाच्या भरवशावर मुख्यमंत्री मत मागतात, त्याच मुख्यमंत्र्यांना आता सत्तेचा लोभ आला आहे. राज्यावर आलेले संकट पाहता आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहोत. त्याचवेळी कार्यकर्त्यांनो मुंबईला येऊ नका असेही आवाहन त्यांनी केला. आपल्याला मुंबईकरांना कोणताही त्रास द्यायचा नाही. मला अनेकदा मुंबईत रोखण्यासाठीचा प्रयत्न केला गेला, पण मुंबईत पायच ठेवला नाही, तर संपूर्ण जिवंत उभा असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी या हनुमान चालीसा पठणाला विरोध केला नसता. खरे शिवसैनिक असतील, तर मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचुया असेही आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. आम्ही दहशतवादी नाही. तसेच आम्ही कोणतीही तलवार घेऊन मातोश्रीवर चाललेलो नाही. आम्हाला परवानगी मिळाल्यास आम्ही मातोश्रीतही हनुमान चालीसा पठण करायला तयार आहोत असे खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला लागलेली साडेसाती आणि शनीची दशा दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा पठण करणार आहोत. बाळासाहेबांचा विचार असता तर खऱ्या शिवसैनिकांनी हनुमान चालीसेला कधीच विरोध केला नाही. फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून आणि भाजपचा चेहरा ठेवून हे मुख्यमंत्री सत्तेत आले आहेत. पण आता मात्र त्यांना बाळासाहेबांचा विचार पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व सोडले आहे. फक्त मत मागण्यासाठी त्यांना हिंदुत्व आठवते. पण मतदार आगामी काळात त्यांना जागा दाखवतील असेही राणा म्हणाले.

ती जबाबदारी मुख्यमंत्र्यांची अन् शिवसैनिकांची

आम्ही अतिशय शांततेच्या माध्यमातून हनुमान चालीसा पठण करणार आहोत. आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, कुणीही मुंबईला येऊ नका कारण आपल्याला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही. तसेच मुंबईकरांची गैरसोय करायची नाही. त्यामुळे आम्ही शांततेने पोलिसांना सहकार्य करणार आहोत. त्यामुळे कोणताही विरोध किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री स्वतः आणि शिवसैनिक जबाबदार ठरतील असेही रवी राणा यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री २ वर्षानंतर मंत्रालयात

एखादी कुटुंबातील व्यक्ती कामावर जाणे बंद केल्यानंतर घरातील किचन कोलमडते. महाराष्ट्रात तर गेली दोन वर्षे मुख्यमंत्री हे मंत्रालयातच गेले नाहीत. महाराष्ट्रात वारंवार अनेक संकटांच्या माध्यमातून साडेसाती आणि शनीची दुर्दशा निर्माण झाली आहे. हनुमान चालिसेचे पठण हे हुनमान जयंतीला केले असते तर महाराष्ट्रावरचे हे संकट टळले असते. त्यामुळेच हनुमान चालीसा पठणाची गरज आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांकडे असलेल्या फायलिंचे गठ्ठे एकीकडे संपत नाहीत, तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री घरी बसून फायलींवर सह्या करतात अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली.

याआधी मुंबई पोलिसांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रतिबंधात्मक नोटीस देत कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही राणा दांपत्याची असेल असे स्पष्ट केले आहे. तसेच राणा दांपत्याला रोखण्यासाठी मातोश्री येथेही शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी सकाळपासूनच याठिकाणी ठिय्या मांडला होता. पण गेल्या अनेक दिवसांपासून राणा दांपत्यावर पोलिस आणि शिवसैनिकांनी पाळत ठेवलेली असतानाही राणा दांपत्य हे रस्त्याच्या मार्गातून मुंबईत दाखल झाले. शिवसेनेने मुंबई पाय ठेवून दाखवा असे आव्हान राणा दांपत्याला याआधी दिले होते.

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -